आंतर हॉस्पिटल सिंगल विकेटमध्ये सुशांत गुरव विजेता

Santosh Sakpal June 06, 2023 03:22 PM

MUMBAI/NHI

लायन्स क्लब इंटरनॅशनल-मुंबईचे डीस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. जगन्नाथराव हेगडे वाढदिवस चषक विनाशुल्क आंतर हॉस्पिटल सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेत सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा अष्टपैलू सुशांत गुरवने बाजी मारली. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप आयोजित स्पर्धेमध्ये सुशांत गुरवने ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा अष्टपैलू इसाकी मुत्थूचा १५ धावांनी पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार देऊन अष्टपैलू क्रिकेटपटू डॉ. हर्षद जाधव, सुहास जोशी, चंद्रकांत करंगुटकर, प्रदीप क्षीरसागर व संयोजक लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.

शिवाजी पार्क मैदानामध्ये झालेल्या आंतर हॉस्पिटल सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेत रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा गाजविणारे क्रिकेटपटू प्रदीप क्षीरसागर, संदीप गुरव, अरुण पारचा, डॉ. मनोज यादव, रोहन महाडिक आदी क्रिकेटपटूंना निसटत्या पराभवास सामोरे जावे लागले. उपांत्यपूर्व सामन्यात अरुण पारचाला १३-१२ धावांनी पराभूत करणाऱ्या सुशांत गुरवने अंतिम फेरीत मात्र धडाकेबाज फलंदाजी केली. सुशांतने षटकार व चौकारांची आतषबाजी करून एका षटकात १९ धावा फटकावीत इसाकी मुत्थूच्या गोलंदाजीवर वर्चस्व मिळविले. इसाकीची पहिल्याच चेंडूवर विकेट मिळविल्यामुळे सुशांत गुरवने निर्णायक लढत १९-४ अशी सहज जिंकली. उपांत्य उपविजेतेपदाचा पुरस्कार अफझल शेख व सुरज जाधव यांनी पटकाविला. प्रथमच झालेल्या आयडियल आंतर हॉस्पिटल सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेमध्ये रुग्णालयीन क्रिकेटपटूंनी जोशपूर्ण खेळ दर्शविला.