विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदे पोहचले शेतक-यांच्या बांधावर

Santosh Gaikwad April 10, 2023 06:01 PM


मुंबई :   अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आयोध्दा दौ-यावर गेल्याने विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. मात्र  विरोधकांच्या टीकेनंतर आयोध्दा दौरा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शेतक-यांच्या बांधावर पोहचले. यावेळी मुख्यमंत्रयानी कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह पीकांच्या नुकसानीची पाहणी केली.  शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. मुख्य सचिवांना व राज्यातील सर्व जिल्हाधीकाऱ्यांना मी सुचना केल्या आहेत. युद्धपातळीवर पंचनामे सुरू झाले. सर्व पालकमंत्र्यांना नुकसानीचे पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे झाल्यावर नुकसान भरपाई देण्यात येईल असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

राज्यात मागील तीन दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतमालाचे मोठं नुकसान केलं आहे. गारपिटीमध्ये कांदा, द्राक्ष, गहू, आंबा, भाजीपाल्यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकिकडे शेतकरी संकटात असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, खासदारांचा काल (रविवारी) अयोध्या दौरा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपचे नेतेही उपस्थित होते. या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली होती. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात असताना सत्ताधारी दौरा करत असल्याने विरोधकांकडून शिंदे फडणवीस यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. शिवसेना उध्दव ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील नेत्यांनी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. 

अखेरअयोध्येतून परतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे शेतकऱ्याच्या बांधावर पोहचले. बागलाण तालुक्यातील (जि.नाशिक) निताने, बिजोटे,आखटवाडे या शिवारात गारपीट व वादळामुळे नुकसान झालेल्या कांदा, पपई, डाळिंब यासह इतर पिके-फळबागांची पाहणी केली. तसेच त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री उपस्थित होते. एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. मुख्य सचिवांना व राज्यातील सर्व जिल्हाधीकाऱ्यांना मी सुचना केल्या आहेत. युद्धपातळीवर पंचनामे सुरू झाले. सर्व पालकमंत्र्यांना नुकसानीचे पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे झाल्यावर नुकसान भरपाई देण्यात येईल.

अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात ६ हजार ६८५ हेक्टरवरील शेतीला फटका बसल्याचे प्राथमिक अहवालातून स्पष्ट झालंय. जवळपास १२  हजार ४८३  शेतकर्‍यांचे नुकसान या अवकाळीने केलं आहे. अमरावती, अकोला बुलढाणा आणि वाशिमध्ये २४२ गावे अवकाळी पावसाने बाधित आहेत. एकूण ७४०० हेक्टर नुकसान झालं आहे. ७५९६ एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे. याचे पंचनामे सुरू झाले आहेत. बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ मदत दिली जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करणार. तीन वेळा अमरावती विभागात अशी आपत्ती आली आहे. यापूर्वी आलेल्या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. त्याची मदत लवकर देण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.