भारत-पाकिस्तान युद्धातील योद्धे शिवाजीराव येवारे यांचे निधन

Santosh Gaikwad December 21, 2023 05:38 PM


   कोल्हापूर : १९७१ च्या भारत-पाक युद्धात सहभागी होऊन पराक्रम गाजविलेले भारतीय नौदलातील  योद्धे   शिवाजीराव येवारे यांचे बुधवार, दि. २० डिसेंबर, २०२३ रोजी कोल्हापूर येथील एका खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.

 शिवाजीराव येवारे हे दि. ११ मार्च, १९६१ रोजी भारतीय नौदलात प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून दाखल झाले. आपल्या कार्यकौशल्याने त्यांनी आपल्या कामाचा प्रभावी ठसा उमटविला. परिणामी, १९७१ साली झालेल्या भारत-पाक युद्धात त्यांना सहभागी करून घेण्यात आले.

   २०२१ साली मुंबईतील बांगलादेश दूतावासाने १९७१ च्या भारत-पाक युद्धातील भारतीय योद्ध्यांचा तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार केला. त्यावेळी श्री. शिवाजीराव येवारे यांचा देखील राज्यपालांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला होता.

   श्री. येवारे यांच्या पश्चात पत्नी कमल, कन्या सौ. सविता वाबळे, सुपुत्र प्रताप आणि प्रशांत, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि दै. ‘शिवनेर’चे संपादक श्री. नरेंद्र वि. वाबळे यांचे ते सासरे होत. 

   गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर येथे कै. येवारे यांच्या पार्थिवावर  शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे धाकटे चिरंजीव प्रशांत यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला.

----------------