मुंबईतून इंडिया ने फुंकले रणशिंग, भाजपविरोधात रणनिती !

Santosh Gaikwad September 01, 2023 06:49 PM


जुडेगा भारत,  जितेगा इंडिया चा नवा नारा 

मुंबई : इंडिया आघाडीची मुंबईतील दोन दिवसीय बैठक आज पार झाली. देशभरातील विविध राज्यातील २८ पक्ष या बैठकीत सहभागी झाले हेाते. आगामी  लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात रणनिती आखण्यात आली. या बैठकीत  जुडेगा भारत, जितेगा जुडेगा भारत जितेगा इंडिया नवा नारा देण्यात आला. तर इंडिया आघाडीची १४ जणांची समन्वय समितीची घोषणाही करण्यात आली.  यानंतर पत्रकार परिषदेमध्ये या आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांनी आपली मतं व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांच्या एकजुटीने भाजपला हरवणं शक्य असून,  इंडिया आघाडी जिंकण्याच्या विश्वास सर्व नेत्यांनी व्यक्त केला.
   

चुकीच्या मार्गावर जाणार नाही, गेलेल्यांना रस्त्यावर आणू : शरद पवार


शरद पवार बोलताना म्हणाले की, देशाच्या समोर एक गंभीर समस्या आहे, त्यावर एकत्र येत काम करणं गरजेचं आहे. त्याबाबत दोन दिवस आम्ही चर्चा केली असून देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी स्थिती आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, बेरोजगारी, महागाईचे विषय असोत, सरकारचं याकडे दुर्लक्ष आहे. पवार पुढे म्हणाले की, भाजपविषयी लोकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. सत्ता हातात आल्यावर त्यांनी ज्या पद्धतीने कारभार केला त्याचे गंभीर परिणाम दिसून आले. राजकारणात राजकीय पक्ष एकत्र काम करण्याची भूमिका घेत असतात, त्यामुळे समजूतदारपणा असायला हवा. आज इथे बैठक घ्यायचं ठरवलं त्यांनतर भाजपचे लोक टीका करायला लागले, हे चुकीचं आहे. शरद पवार पुढे म्हणाले की, इथल्या लोकांना घंमडिया बोलतात... घंमडिया कोणाला बोलतात... एकत्र आले ते पटत नाही त्यांना घंमडिया बोलतात. परंतु आम्ही चुकीच्या रस्त्यावर जाणार नाही. जे चुकीच्या रस्त्यावर गेले त्यांना चांगल्या रस्त्यावर आणण्याचं काम करू. असं म्हणत शरद पवारांनी चर्चेला विषय दिला आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून वेगळी भूमिका घेतली. सत्तापक्षाला समर्थन देऊन अजित पवार सत्तेत गेले आहेत. त्यांच्याकडे रोख देऊन शरद पवार बोलले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवार पुन्हा भूमिका बदलणार का? असाही प्रश्न पवारांच्या विधानामुळे उपस्थित होतोय.


 भाजप सरकार गरीबांचे पैसे उद्योगपतींना देते : राहुल गांधींचा हल्लाबोल


काँग्रेस नेते  राहुल गांधी यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यावेळी त्यांनी अदानी मुद्द्यावर देखील हल्लाबोल केला. गांधी म्हणाले की, देशातील ६० टक्के लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक इथं बसले आहेत. कॉर्डिनेशन कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर जागा वाटपाबाबत समिती नेमली आहे. इंडिया आघाडीसाठी ही सर्वात मोठी गोष्ट आहे, असे राहुल गांधी म्हणाले. भाजप सरकार गरीबांचे पैसे उद्योगपतींना देत आहे. गरीब शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करणार आहोत. इंडिया आघाडी भाजपला हरवणार असल्याचा विश्वास देखील राहुल गांधी यांनी व्यक्त केला. गांधी म्हणाले की, एका माणसासाठी पंतप्रधान काम करत असल्याचा पूर्नरूच्चार केला.  नरेंद्र मोदी यांनी अदानी यांची चौकशी करायला पाहीजे. त्यांनी चौकशी केली नाही तर मिलिभगत असल्याचे स्पष्ट होईल.    पंतप्रधान नरेंद्र मोदी अदानींच्या चौकशीसाठी दबाव का टाकत नाही आहेत असा सवाल राहूल गांधी यांनी केला. राहुल गांधी म्हणाले, मी नुकताच लडाख दौरा केला. तिथली परिस्थिती पाहिली. चीन आपल्या भागात आला आहे. मीडिया याबाबत काहीच बोलत नाही. लडाखमध्ये जी परिस्थिती आहे ती लज्जास्पद आहे. नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्यातील जे नातं आहे त्यावर मी काल बोललो. 1 बिलियन डॉलर्स भारतातून बाहेर गेले आणि परत आले.  नरेंद्र मोदी G20 भरवत आहेत. मात्र त्यांनी अदानी यांची चौकशी करावी.


हुकुमशाही, जुमलेशाही, भ्रष्टाचाराविरोधात लढू : उध्दव ठाकरे

शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. ठाकरे म्हणाले की, इंडियाची तिसरी बैठक संपन्न् झाली दिवसेंदिवस इंडिया मजबूत होत आहे त्यामुळे विरोधी गटात भिती पसरली आहे. आमची देशभक्तीची आघाडी आहे जे इंडियाचे विरोधक आहेत ते सगळयांना माहित आहेत आजच्या बैठकीत चांगले निर्णय झाले समिती स्थापन झाल्या हुकुमशाही जुमलेशाही भ्रष्टाचाराविरोधात आम्ही लढाई लढू मित्रपरिवार वादासोबतही  आम्ही लढणार आहोत सबका साथ सबका विकास हा निवडणुकीत नारा दिला गेला परंतु ज्यांनी साथ दिली त्यांना लाथ मारली हे आमही पाहिले आहे असं ते म्हणाले.  2014 मध्ये जी किंमत एलपीजी गॅसची होती ती वाढतच गेली पाच वर्षे लूट आण  निवडणुकीच्यावेळी सूट असं भाजपचं धोरण असल्याची टीका ठाकरे यांनी केली.


 
मणिपूर जळत होतं, तेव्हा अधिवेशन बोलवलं नाही : मल्लिकार्जून खर्गे


काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. "महागाई, बेरोजगारी याविरोधात लढण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मोदी नेहमी 100 रुपयांनी भाव वाढवतात आणि 2 रुपयांनी कमी करतात. आता सिलिंडर गॅस कमी केला पण 200 रुपयांनी पण अजूनही 700 रुपये सिलिंडर आहे. मोदी गरिबांसाठी काम करत नाहीत पण मोठ्या उद्योगपतींसोबत ते चालतात. काल राहुल गांधी यांनी अदानींसंदर्भात सांगितलं. त्यामुळं गरिबांचा जो पैसा लुटला जात आहे, तो थांबवण्यासाठी इंडिया आघाडी जिंकणं आवश्यक आहे. खर्गे म्हणाले, मणिपूर जळत होतं तेव्हा केंद्र सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलं नाही. कोविडच्या काळातही बोलवलं नाही, नोटबंदी झाली तेव्हा अधिवेशन बोलावण्यात आलं नाही. मग आताच का संसदेचं अधिवेशन बोलावण्यात आलं? देशात हळूहळू हुकूमशाही येत आहे. त्यांना वाटतं मीडिया देखील त्यांच्यासोबत आहे. मीडियाच्या लिखाणावर निर्बंध आणले जाताहेत. गरिबांच्या विकासासाठी इंडिया आघाडी सत्तेत येणं गरजेचं आहे, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अदानींचं नाव घेत पंतप्रधान मोदींवर टीका केली. इंडियाच्या मुंबईतील दोन दिवसीय बैठकीनंतर समारोपाच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  


मोदींना सूर्यावरती पाठवावं : लालूप्रसाद यादव


राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींवर टीका केली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटं बोलून आणि अफवा पसरवून सत्तेत आले, आम्ही सगळे फसलो, आता इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी मोदींना सूर्यावरती पाठवावं, त्यांचं नाव जगभर होऊ दे अशी मिश्किल टिप्पणी   लालू प्रसाद यादव यांनी केली. आम्ही घाबरणार नाही, मोदींना सत्तेतून हटवूनच शांत बसणार असा निश्चयही त्यांनी व्यक्त केला.  मोदी म्हणाले सत्तेत आल्यानंतर स्वीस बँकेचा पैसा परत आणतो आणि लोकांच्या खात्यामध्ये पाच पाच लाख रुपये देतो. आम्ही पण फसलो आणि बँकेत अकाऊंट उघडलं. पण अजून आमच्या खात्यात काहीच जमा झालं नाही. देशात इतकी गरीबी असताना हे म्हणतात की देशाचा विकास होतोय.  या आधी आम्ही एक नव्हतो, त्याचा फायदा हा मोदींनी घेतला आणि सत्तेत आले. आता देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र आले असून मोदींनी सत्तेतून घालवूनच आम्ही शांत बसणार असं ते म्हणाले. ते म्हणाले की, भाजपा हटावो आणि देश बचाओ यासाठी आम्ही सुरवात केली आहे. देशातील अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत. महागाई वाढली आहे. टोमॅटोला चव नाही असेही लालूप्रसाद यादव म्हणाले. लालूप्रसाद यादव यांनी भाषणाच्या शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी लढत राहावं, ते जुने नेते आहेत, आम्ही त्यांच्या पाठिशी आहे असंही ते म्हणाले.


मोदी सरकार हे अहंकारी आणि भ्रष्ट सरकार  : अरविंद केजरीवाल


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर हल्लाबोल केला. अरविंद केजरीवाल म्हणाले, देशातील मोदी सरकार सर्वात भ्रष्ट सरकार आहे. हे अहंकारी सरकार आहे. सरकार फक्त एका माणसासाठी करत आहे. इंडिया आघाडी 28 पक्षांची आघाडी नाही तर भारतातील 140 कोटी लोकांची आघाडी आहे. लोक एकत्र येत आहेत. मोदी सरकार स्वतंत्र भारतातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. परदेशातील वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर बातम्या छापल्या जात आहेत. एका माणसासाठी सरकार काम करत आहेत. एक माणूस देशातील पैसा बाहेर घेऊन जात आहे. यापेक्षा जास्त अहंकारी सरकार झालेलं नाही, असं केजरीवाल म्हणाले.  इंडिया आघाडी मोदी सरकारला सत्तेवरुन पायउतार करण्याचे कारण बनेल, असे सर्वांना वाटत आहे. त्यामुळे मोठी शक्ती या आघाडीला तोडण्यासाठी लावली जाईल. आघाडीत भांडण झाल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र मी जबाबदारीने सांगतो. कुणाचे भांडण नाही. आघाडीत कुणीही पदासाठी आले नाहीत तर देश वाचवण्यासाठी आले आहेत. येणाऱ्या काळात भारत एकत्र येणार आहे असे केजरीवाल म्हणाले.  

पुढील बैठक दिल्लीत ! 

इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली या बैठकीला २८ पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत तीन महत्वाचे ठराव पारीत करण्यात आले. जागा वाटपावर चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी इंडिया आघाडीची  पुढील बैठक कुठे होणार आहे हे स्पष्ट केले आहे.  पत्रकारांनी त्यांना पुढील बैठक कुठे होणार असा प्रश्न केल्यानंतर त्यांनी त्यावर दिल्ली असं उत्तर दिलं. तारीख विचारल्यानंतर त्यांनी तुम्हाला कोणती तारीख हवी त्या तारखेला ठेवू असा टोमणा लगावला. 
------