हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण

Santosh Gaikwad March 04, 2024 06:20 PM


नाशिक,इगतपुरी,दि.४ मार्च :- समृध्दी महामार्ग हा अतिशय सुंदर प्रकल्प निर्माण झाला आहे. या रस्त्यावरून चालताना चालक संमोहित होत असतात त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना चालकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.


आज इगतपुरी येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय राज्य मंत्री डॉ.भारती पवार, उपस्थितीत आणि मंत्री दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  यावेळी आमदार हिरामन खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, पांडुरंग गांगड, काशिनाथ मेंगाळ, व्यवस्थापकीय संचालक डॉ.अनिलकुमार गायकवाड, सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदाल, कैलास जाधव, श्री.कैलास पाटील, अजय बोरस्ते, गोरख बोडके, सुनील बच्छाव, प्रवीण तिदमे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. 


यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते नागपूर स्थित मिहान यांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे बंदरावरून जलद वाहतूक करून आवश्यक माल भारतभर वेळेवर पोहचवणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणुकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागास महत्वाचा ठरलेला आहे.इगतपुरी इंटरचेंजचा वापर करुन ठाणे, मुंबई परिसरातुन शिर्डी येथे जाणा-या भाविकांचा प्रवास सुलभ व जलद होईल व १ तासात शिर्डीला पोहचता येईल. याशिवाय शिर्डी, अहमदनगर व नाशिक जिल्हयातील सिन्नर व इगतपुरी परिसरातील शेतक-यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येणे व जाण्यासाठी कमी कालावधी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.





यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या एकात्मिक नियोजन आणि पायाभूत सुविधा कनेक्टीव्हिटी प्रकल्पांच्या एकत्रित अंमलबजावणीचे समर्थन करणारा हा महामार्ग दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि शिर्डी, अजिंठा, वेरूळ लेणी, लोणार सरोवर आणि इतर पर्यटन स्थळांना जोडणारा आहे. तसेच समृध्दी महामार्गामुळे कृषी, पर्यटन, दळणवळण, उद्योग इ. क्षेत्रे विकसित होऊन मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच इंधनाची आणि वेळेची बचत होणार आहे. समृध्दी महामार्गामुळे पर्यावरणाचे संतुलनासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणेत येत आहे, १८ कृषी समृद्धी केंद्रे उभारणेचे प्रस्तावित आहे. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारकडून पायाभूत सुविधा प्रकल्पांना मानवी चेहरा दिला जात असून विविध क्षेत्रात मुलगामी परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाचे ग्रोथ इंजिन असणाऱ्या महाराष्ट्रासाठी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ही खऱ्या अर्थाने समृद्धीची भाग्यरेषा ठरेल असे त्यांनी सांगितले.


नाशिक मुंबई रस्त्याच्या चौपदरी काँक्रीटीकरण काम सुरू करण्यास प्राधान्य द्यावे


नाशिक मुंबई रस्त्याचे विस्तारीकरण व सहापदरी काँक्रीटीकरण करण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम सुरू करण्यास प्राधान्य देण्यात यावे. तसेच भिवंडी बायपास रस्त्याचे काम लवकरात पूर्ण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी सार्वजनिक मंत्र्यांकडे केली.