दिवाळी अंकाच्या रूपात आपली परंपरा जपतोय : राही भिडे यांचे प्रतिपादन

Santosh Gaikwad November 07, 2023 08:00 PM


मुंबई मराठी पत्रकार संघात  दिवाळी अंकांचे प्रदर्शन  


मुंबई : दिवाळी अंक ब-याच वर्षापासून निघत आहेत. अनेक वर्षे लहानपणी   दिवाळी अंकांची जी नाव आपण वाचत होतो ती नावं आजही दिसतात याचा अर्थ अंकांचे सातत्य कायम असल्याचे दिसते. सगळे इंग्रजी झालय असं बोललं जातं, पण दिवाळी अंकांच्या रूपात आपली सगळी परंपरा आपण जपत आहेात याचा अभिमान वाटतो असे  प्रतिपादन पत्रकार संघाच्या विश्वस्त, ज्येष्ठ पत्रकार राही  भिडे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि.वाबळे होते.  याप्रसंगी संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर,  सहकार्यवाह विष्णु सोनावणे, आत्माराम नाटेकर, राजेंद्र हुंजे आदी उपस्थित होते. 

 

 मुंबई मराठी पत्रकार संघात दरवर्षी दिवाळी अंकांचे प्रदर्शन आयोजित केले जाते. मंगळवार, दि. ७ नोव्हेंबर ते शनिवार, दि. ११ नोव्हेंबर २०२३ पर्यंत सकाळी ११.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत  हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले  असेल. या प्रदर्शनाचे उद्घाटन राही भिडे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांच्या हस्ते राही भिडे यांचे शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी बोलताना  राही भिडे यांनी पत्रकार संघाच्या दर्पण दिवाळी अंकाचे कौतूक केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांचा मुख्यमंत्रयावरील लेख खूपच वाचनीय झाला असल्याचे सांगितले. राजकारणातील अशा प्रकारचे राजकीय  किस्से लोकांना वाचायला खूप आवडतात असेही भिडे म्हणाल्या. 


पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद वाबळे म्हणाले की, दिवाळी अंकाची ११५ वर्षाची परंपरा आहे. मराठीतील दिवाळी अंक प्रत्येक मराठीकाराला दिसलाच पाहिजे हे आम्ही लहानपणापासून पाहात आलोय.  दिवाळी अंक नसेल तर लहानपणी आम्हाला दिवाळी आवडायची नाही. फराळ आणि फटाके आधी दिवाळी अंक हवा असायचा. दिवाळी अंकाचा दर्जा आणि साहित्याची कमान वाढली आहे असेही वाबळे म्हणाले. 


पत्रकार संघाचे कार्यवाह संदीप चव्हाण म्हणाले की दिवाळी अंकांची परंपरा कायम ठेवण्याचा वसा मुंबई मराठी पत्रकार संघाने कायम ठेवला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून शंभरहून अधिक  दिवाळी अंक प्रदर्शनात असून लाखमोलाची बक्षिसे ठेवण्यात आली आहे. पत्रकार संघाचा दर्पण दिवाळी अंक अॅमेझॉनवर उपलब्ध हेाणाार आहे असेही त्यांनी सांगितले.  


 यावर्षीच्या प्रदर्शनात ऋतुरंग, कालनिर्णय, चंद्रकांत, लोकमत, हेमांगी, गृहलक्ष्मी, अ‍ॅग्रोवन, धनंजय, हंस, अन्नपूर्णा आदी विविध वाचनीय व दर्जेदार अंक पहावयास मिळतील. साहित्य रसिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.