क्लस्टर योजनेचा माध्यमातून एक सुनियोजित शहर उभारण्याचे स्वप्न : मुख्यमंत्री

Santosh Gaikwad June 06, 2023 09:03 AM

ठाणे : आशिया खंडातील सर्वात मोठ्या समूह विकास (क्लस्टर) योजनेच्या कामाचा शुभारंभ सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ठाण्यातील समूह पुनर्विकास योजनेचे काम सुरू करणे हे माझे स्वप्न आहे. या योजनेच्या माध्यमातून एक सुनियोजित शहर उभारण्याचे आमचे स्वप्न आहे. सिडकोद्वारे बांधण्यात येणाऱ्या घरांच्या दर्जा पेक्षाही चांगल्या गुणवत्तेची घरे येथे उभारण्यात येतील असे मुख्यमंत्री म्हणाले.


मुख्यमंत्री म्हणाले की, सुमारे 1500 हेक्टर जमिनीवर वेगवेगळ्या टप्प्यात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात सुमारे 10 हजार घरांची निर्मिती होणार आहे. हा एक ऐतिहासिक प्रकल्प होणार आहे. ज्या दिवशी या योजनेतील घराची चावी नागरिकांना मिळेल तो दिवस माझ्यासाठी सर्वात परमोच्च आनंदाचा दिवस असेल. 


मुख्यमंत्री  शिंदे म्हणाले की, 1997 मध्ये ठाण्यातील साईराज इमारत पडल्यानंतर अनधिकृत धोकादायक इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनधिकृत इमारती या गरजेपोटी बांधल्या होत्या. घरे अनधिकृत असली तरी माणसे तर अधिकृत होती. त्यामुळे या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तेव्हापासून अनेक आंदोलने, संघर्ष केले. या.योजनेत नुसतेच इमारती उभ्या राहणार नाहीत, तर येथे मोकळी मैदाने, उद्याने, आरोग्याच्या सुविधाही असतील.  अधिकृत इमारती व सध्या सुरु असलेल्या पुनर्विकास योजनेतील इमारतींना या क्लस्टर योजनेत समावेश हा ऐच्छिक ठेवला असून यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 


ठाण्याप्रमाणेच मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील मीराभाईंदर, कल्याण, भिवंडी आदी क्षेत्रातील अनधिकृत धोकादायक इमारतींच्या क्लस्टर योजनेचा मार्ग मोकळा केला आहे. मीरा भाईंदरमधील क्लस्टर योजना दिवाळीनंतर सुरू होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पासाठी आवश्यक तेथे नियमात बदल करून आता असे प्रकल्प शासनामार्फत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सिडको, म्हाडा, एमएमआरडीए, महाप्रित, एसआरए आणि अन्य सर्व गृहनिर्माण संस्थांची मदत घेऊन हे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, असेही  शिंदे यांनी सांगितले.


किसन नगर येथील समूह विकास योजनेच्या कामांची सुरुवात 1997मध्ये पडलेल्या साईराज इमारतींतील रहिवासी दाम्पत्यांच्या हस्ते पूजा करून करण्यात आली. यावेळी क्लस्टर योजनेच्या लोगोचे मुख्यमंत्र्यांनी अनावरण  झाले. यावेळी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी मनोगत व्यक्त केले तर महापालिका आयुक्त  बांगर यांनी प्रास्ताविकात क्लस्टर योजनेची माहिती दिली.