हिरालाल समरिया नवे मुख्य माहिती आयुक्त

Santosh Gaikwad November 06, 2023 07:29 PM


 नवी दिल्ली, दि. 6 : देशाचे 12वे  मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरिया यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माहिती आयुक्त  समरिया यांना राष्ट्रपती भवनात मुख्य माहिती आयुक्त पदाची आज शपथ दिली.  .समरिया सध्या माहिती आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयात सचिव म्हणूनही काम केले आहे.


हिरालाल  समरिया यांचा जन्म राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील पहाडी या दुर्गम आणि लहान गावात 14 सप्टेंबर 1960 रोजी झाला. ते 1985 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी राजस्थान विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयात सचिव आणि अतिरिक्त सचिव पदावर काम केले आहे. रसायने आणि खते मंत्रालयातील सहसचिव, तसेच तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातही त्यांनी आपली सेवा दिलेली आहे.


  राष्ट्रपती भवनात आज सकाळी 10 वाजता झालेल्या समारंभात  समरिया यांना केंद्रीय माहिती आयोगाच्या मुख्य माहिती आयुक्तपदाची शपथ देण्यात आली. वाय.के.सिन्हा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रिक्त झालेल्या मुख्य माहिती आयुक्त पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.