पावसाचा जोर वाढला : पालघरला रेड अलर्ट तर मुंबई, ठाण्यात ऑरेंज अलर्ट !

Santosh Gaikwad July 22, 2023 09:47 AM

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. तर ठिकठिकाणी  पाणी साचले आहेत.  शनिवारी पुणे हवामान विभागाने आज पुन्हा रेड अलर्ट जारी केला आहे. पालघर, सातारा, पुणे आणि चंद्रपूर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबई, ठाणे रत्नागिरी, जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. २३ जुलै रोजी पुणे आणि पालघर जिल्ह्यास रेड अलर्ट दिला आहे.


मुंबई उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. कल्याण डोंबिवलीत सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. सखल भागात अन् रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कल्याणमधील टिळक चौक रस्त्यावर गुढघाभर पाणी साचले आहे. यामुळे वाहन चालकांना कसरत करत पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. भिवंडीतही मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने रस्त्यांना नदयांचे स्वरूप आले आहे. बाजारपेठेत पाच ते सहा फूट पाणी शिरल्याने बाजारपेठ बंद पडली आहे. पालघर जिल्हयातील शाळा तिस-या दिवशी बंद ठेवण्यात आल्या आहेत. अनेक धरणांमध्ये जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे.  


मुंबई महानगरपालिकाचे आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंग चहल यांनी मुंबईमध्ये जोरदार पावसानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.  मुंबईसह उपनगरात गेल्या आठवडाभरापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना कामावर निघताना मोठी अडचणी होत आहे. मुंबई शहर, तसेच उपनगरांत पावसाचा जोर वाढला. मुंबईतील कुर्ला, चेंबूर, विक्रोळी, अंधेरी परिसरात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे सखलभाग जलमय झाले आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. त्याचबरोबर हार्बर मार्गावरही पाणी साचल्याने काही काळ लोकलचा खोळंबा झाला. राज्यात आतापर्यंत ७८ टक्के पेरण्या झाल्या आहेत.