मुंबई ठाण्यासह राज्यात तुफान पाऊस, शेतकरीराजा सुखावला !

Santosh Gaikwad September 07, 2023 07:44 PM


मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने गुरूवारी हजेरी लावल्याने चिंतेत असलेल्या शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई ठाण्यातही सकाळपासून  तुफान पाऊस पडतोय. त्यामुळे गोविंदा पथकही सुखावले होते. 


पावसाने विश्रांती घेतल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. पाऊस नसल्याने भात पीक करपण्याची भिती शेतक-यांना लागून राहिली हेाती. अखेर बुधवारी रात्रीपासूनच राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतक-यांच्या चेह-यावर आनंद पसरला. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या शहारांमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. याशिवाय पालघर, रायगड जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडतोय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाचं आगमन झालंय. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात आज जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने देखील वर्तवली आहे. 


वाशिम, हिंगोली धुळे बुलढाणा पालघर नांदेड अमरावती जिल्हयात पडलेल्या जोरदार  पावसाने काही प्रमाणात शेतकरी सुखावला आहे. तर शेती पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. करपत असलेल्या सोयाबीन, तूर, हळद , कपाशी पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत आहे. मागच्या काही दिवसांत पाऊस झाला नसल्याने पिके सुकत होती. आजच्या पावसामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र बळीराजा अजूनही जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे  पावसाअभावी पिकांचं अतोनात नुकसान झालं असलं तरी, आलेला पाऊस हा काहीसा दिलासा देणारा ठरला असल्याचं शेतकऱ्यांनी म्हणणं आहे.