आरोग्य विभागात भरती : १० हजार ९४९ जागांसाठी २ लाख ५७ हजार ३५० उमेदवार !

Santosh Gaikwad December 13, 2023 06:58 PM


नागपूर, दि.१३ : आरोग्य विभागातील गट 'क ' आणि ' ड' संवर्गातील एकूण १०,९४९ रिक्त पदासाठी २९ ऑगस्ट २०२३ रोजी जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार दि. ३१ नोव्हेंबर, ७ डिसेंबर आणि १२ डिसेंबर रोजी राज्यातील २९ जिल्ह्यांतील १०८ परीक्षा केंद्रांमध्ये तीन सत्रात एकूण २ लाख ५७ हजार ३५० उमेदवारांनी ही ऑनलाईन परीक्षा दिली आहे. 


२०२१ मध्ये या संवर्गातील पदे भरण्यासाठी परीक्षा घेण्यात आली होती. परंतु नव्याने जाहिरात देऊन पदभरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निर्देशानुसार परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यासाठी प्रक्रियेनुसार टीसीएस या एजन्सीची निवड करण्यात आली होती. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी टिसीएसकडून सीसीटिव्ही रेकॉर्डिंग, बायोमेट्रीक्स हजेरी, आयरीस तपासणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. तसेच ईलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. (ईसीआयएल) यांच्याकडून परीक्षा केंद्रामध्ये परीक्षेच्या कालाधीत ५-जी मोबाईल जॅमर्स व्यवस्था करण्यात आलेली होती.


 राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने आरोग्य विभागातील १०० टक्के रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु असून, गट क आणि ड संवर्गातील रिक्त पदांसाठीची परीक्षा तीन टप्प्यात यशस्वीरित्या पार पडली. ही परीक्षा पारदर्शकपणे व सुरळीतपणे पार पडण्यासाठी प्रा. डॉ. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरावरुन प्रत्येक परीक्षा केंद्रावर संनियंत्रण ठेवण्यात आले.