'जनरल मोटर्स' कंपनी बंद करण्याचा सरकारचा डाव ? : विजय वडेट्टीवार

Santosh Gaikwad October 10, 2023 05:20 PM


मुंबई, दि. १०: पुणे जिल्ह्यातील जनरल मोटर्स कंपनी बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे हे सरकार कामगार विरोधी असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप  विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.  सरकारच्या या भूमिकेच्या विरोधात सुरु असलेल्या कामगारांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर 'टोल' आंदोलनाचे समर्थन करत टोलचा पैसा जातो कुठे असा प्रश्न विचारत सरकारला धारेवर धरले. 

 

 विजय वडेट्टीवार म्हणाले, जनरल मोटर्स कंपनीच्या कामगार देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत सरकारने कामगार विरोधी भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारने या कंपनीचे हस्तांतरण केले नव्हते. कामगारांचे हित जोपासले होते. विरोधी पक्षात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांची बाजू घेतली होती. पण सत्तेत गेल्यावर त्यांनी भूमिका बदलली. कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी कामगारांशी कोणतीही चर्चा न करता कारवाई सुरु केली आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. सरकारने कामगारांचे हित जोपासले पाहिजे, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली.


*पेपर फुटी प्रकरणाची एसआयटी मार्फत चोकशी करा*


राज्यात पेपर फुटल्याशिवाय परीक्षा होत नाहीत. या पेपर फुटीला कोणाची फूस आहे की सरकारच्या आशीर्वादाने हे प्रकरण सुरु आहे असा सवाल करत पेपर फुटी प्रकरणाची एसआयटी मार्फत चोकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. पेपर फुटीमुळे युवकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. सरकरचे हे अपयश असून सर्वच परीक्षा एमपीएसीच्या नियंत्रणात आणाव्यात अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.

मनसे नेते राज ठाकरे यांची टोल संदर्भातील भूमिका योग्य असून टोल आंदोलनाला समर्थन असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. राजरोसपणे टोल वसुली सुरु असून टोलचा पैसा जातो कुठे असा सवाल देखील त्यांनी सरकारला विचारला आहे.


***