मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, १० टक्के पाणी कपात रद्द !

Santosh Gaikwad August 08, 2023 08:05 PM


मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने मुंबई महापालिकेतर्फे करण्यता येणारी १० टक्के पाणी कपात रद्द केली आहे. बुधवार ९ ऑगस्टपासून ही रद्द करण्यात येणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे. 

 

महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा करणा-या सर्वच तलाव क्षेत्रात जुलै २०२३ मध्ये चांगली पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे जलसाठ्यामध्ये समाधानकारक वाढ झाली आहे.  यंदाच्या पावसाळ्यामध्ये प्रारंभी मुंबईस पाणीपुरवठा करणाऱया तलाव क्षेत्रात अपूर्ण पर्जन्यवृष्टीमुळे जलसाठा घटला होता. ती स्थिती लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात दिनांक १ जुलै २०२३ पासून १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 


मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱया अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर इतका असावा लागतो. सद्यस्थितीत तलाव क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने पाणीसाठा ८० टक्क्यांहून अधिक झाला आहे. या कारणाने आता १० टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. ऑगस्ट व सप्टेंबर २०२३ मध्ये काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास, त्याप्रमाणे योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनातर्फे कळविण्यात येत आहे.  तलाव क्षेत्रात पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध होत असला तरी, नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे विनम्र आवाहनही महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.