मराठा आरक्षण द्या, अन्यथा जे होईल त्याला सरकार जबाबदार राहील : जरांगेंचा सरकारला इशारा

Santosh Gaikwad October 14, 2023 06:32 PM


जालना :  आम्ही तुम्हाला दिलेले ४० दिवस संपत  आलेत. त्यामुळे जर मराठा बांधवांना आरक्षण दिलं नाही तर ४० व्या दिवशी समजेल मराठा काय आहे तो. तसंच, २२ ऑक्टोबरला मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे, त्यानंतर जे होईल त्याला सरकार जबाबदार राहील, अशा भाषेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.  


जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये शंभर एकरच्या मैदानात मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा पार पडली या सभेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाज एक होत नाही असं कोण म्हणालं. जे असं म्हणतात त्यांना ही गर्दी दाखवा. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा, कोपर्डीच्या बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी, 

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४५ बांधवांना सांगितलेला निधी, सरकारी नोकरी द्यावी, दर 10 वर्षाने आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करावा, आणि प्रगत जाती बाहेर काढाव्यात अशा मागण्या जरांगे यांनी केल्या. महाराष्ट्रातील मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आता मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग आरक्षण दिलं तरी चालेल. पण, इतर प्रवर्गांप्रमाणे हा प्रवर्गल टिकला पाहिजे, तरच हे आरक्षण आम्ही घेणार, 50 टक्क्यांच्या वर आम्ही आरक्षण घेणार नाही, असं जरांगे पाटलांनी ठणकावून सांगितलं.


मोदींनी फडणवीसांना समज द्यावी 


केंद्रात आणि राज्यात सत्ता आणण्यात मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे, हे स्पष्ट करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना माजी विनंंती आहे की, त्यांनी देवेंद्र फडणवीसांना समज द्यावी. कारण ते त्यांचे कार्यकर्ते आमच्या अंगावर घालत आहेत. परंतु मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि फडणवीसांना सांगायचं आहे की, तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या, मग बघा हेच कार्यकर्ते तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. मराठ्यांना विरोध करणं देवेंद्र फडणवीस यांनी बंद करावं आणि मराठ्यांना आरक्षण द्यावे, असे झाले तर आम्ही ट्रकभर गुलाल घेऊन दिल्लीत येतो, असे जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.


भाजपच्या ट्विटची चर्चा 


जरांगे पाटलांच्या आक्रमक भाषणांनंतर महाराष्ट्र भाजपाने केलेल्या ट्विटरची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजपाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठा आरक्षणासंदर्भात एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मराठ्यांची मागणी योग्य आहे. आम्ही सत्तेत होतो त्यावेळी मराठ्यांना आरक्षण दिले होते. ते हायकोर्टाने वैध देखील ठरवले परंतु सुप्रीम कोर्टात ते शरद पवार,उध्दव ठाकरे यांच्या तत्कालीन सरकारच्या काळात टिकू शकले नाही. पण भारतीय जनता पक्ष मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबध्द आहे, असे सूचक ट्वीट भाजपा महाराष्ट्रकडू करण्यात आले आहे.


वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेच्या सभेवर टीका केलीय. जरांगेच्या सभेला मी यात्रेसारखे पाहतो. लोक येतात मौज मजा करून जातात, त्यांची भाषा शिवराळ आहे. त्यांच्या अकलेची कुवत उघडी पडली आहे, अशी टीका वकिल गुणरत्न सदावर्तेंनी केली. तसेच शरद पवार उद्धव ठाकरे यांनी जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आहे असा आोपही सदावर्ते केला आहे.