भाजपचा किंगमेकर हरपला! खासदार गिरीश बापट यांचं पुण्यात निधन

santosh sakpal March 29, 2023 01:25 PM

पुणे : पुण्यातील भाजप नेते खासदार गिरीश बापट यांचे आज पुण्यात निधन झाले. शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७२ वर्षांचे होते. खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याची माहिती भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून बापट आजारी होते. दरम्यान गिरीष बापट यांच्या पश्चात कुटुंबात एक मुलगा आणि पत्नी आहेत. गिरीश बापट हे १.५ वर्ष रुग्णालयात दाखल होते, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.  गिरीश बापट यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे, अशी माहिती जगदीश मुळीक यांनी दिली आहे. 

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात किंगमेकर अशी ओळख असणारे गिरीश बापट यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

गिरीष बापट यांची राजकिय कारकिर्द

गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहिले आहेत. जनसंघापासून ते राजकारणात उतरले. नगरसेवक पदापासून सुरुवात केलेले गिरीश बापट यांनी 1995 मध्ये आमदारकीची पहिल्यांदा निवडणूक लढविली अन्‌ पुढे सलग 2014 पर्यंत ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले.

यानंतर 1996 साली त्यांना भाजपाने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण बापट यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले. 2014 मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची संधी हुकली. परंतु, 2019 मध्ये योग्यपणे मोर्चेबांधणी करत त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळवले. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला.

कसबा पोटनिवडणुकीसाठी प्रचारात दिसले होते गिरीश बापट

गिरीश बापट गेल्या दीड वर्षांपासून आजाराशी झुंजत होते. त्यांच्यावर उपचारही चालू होते. मात्र, तरीदेखील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत गिरीश बापट एका मेळाव्यात सहभागी झाले होते. त्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली होती. इतके आजारी असूनही भाजपानं बापट यांना प्रचारात उतरवल्याचं टीकास्र विरोधकांनी सोडलं होतं.

याच दरम्यान, गिरीश बापट रुग्णालयातून थेट भाजपाच्या एका जनसंपर्क कार्यालयात दाखल झाल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. गिरीश बापट पुन्हा एकदा राजकारणात पूर्वीप्रमाणेच सक्रीय होणार, अशी चर्चा या घटनेनंतर सुरू झाली होती.

“गिरीशभाऊंना पुणेकरांचं अलोट प्रेम मिळालं”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं. टेल्को कंपनीतल्या कामगारनेत्यापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास पुणे महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री, खासदार पदापर्यंत पोहचला. चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीशभाऊंना पुणेकरांचं अलोट प्रेम मिळालं – अजित पवार


“पुणे शहराच्या राजकारणात गेली ४० वर्षं अतिशय सक्रिय असलेले बापट माझे अतिशय जवळचे मित्र होते. गेल्या ३५ वर्षांपासून आम्ही राजकारणात एकत्र काम केलं”, अशी भावनिक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी दिली आहे.

“हे नुकसान कधीही भरून निघणार नाही”

गिरीश बापट गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मला मनाला विश्वास वाटत होता की आजारी असतानाही त्यांच्याबद्दलच्या बातम्या चुकीच्या ठरतील. पण दुर्दैवाने त्या बातम्या खऱ्या ठरल्या. पुण्याच्या राजकारणाचं, समाजकारणाचं, पुणे-महाराष्ट्र भाजपाचं हे फार मोठं नुकसान आहे. विरोधी पक्षांना सोबत घेऊन कसं काम करायचं यामध्ये त्यांचं कौशल्य होतं. एखादी समस्या कशी सोडवायची, याचं त्यांचं वेगळं कसब होतं. ते सर्वांचे मित्र होते. कुणाशीही शत्रुत्व नाही. हे सगळं एका माणसामध्ये आयुष्यभर मेहनत घेऊन निर्माण होतं – चंद्रकांत पाटील, पुण्याचे पालकमंत्री

“अत्यंत मनमिळाऊ आणि लोकप्रिय नेता”

आत्ताच गिरीश बापट यांच्या निधनाची बातमी ऐकली. महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करत असताना गिरीश बापट मंत्री होते. योगायोगाने आम्ही संसदेत एकत्र काम करू लागलो. संसदेच्या एका कमिटीचे ते चेअरमन होते आणि मी सदस्य होतो. गेल्या ५ वर्षांत सातत्याने गिरीश बापट यांनी सर्व सहकारी सदस्यांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. अत्यंत मनमिळाऊ आणि लोकप्रिय नेता असं त्यांचं वर्णन करावं लागेल. मंत्रीपद मिळाल्यानंतरही कोणतीही मिजास न ठेवता त्यांनी खेळकर स्वभाव कायम ठेवला होता – विनायक राऊत