‘जी-20 डिजिटल अर्थव्यवस्था विषयक कृतिगटाच्या (डीईडब्ल्यूजी)’ तिसऱ्या बैठकीचा आज 14 जून 2023 रोजी समारोप

Santosh Sakpal June 14, 2023 08:11 PM

पुणे, 14 जून 2023

‘जी-20 डिजिटल अर्थव्यवस्था विषयक कृतिगटाच्या (डीईडब्ल्यूजी)’ तिसऱ्या बैठकीचा आज पुणे येथे समारोप झाला. या बैठकीच्या तीन दिवसांच्या कालावधीत, जागतिक डीपीआय शिखर परिषद आणि जागतिक डीपीआय प्रदर्शन यांसारख्या इतर कार्यक्रमांचे आयोजन आणि जी-20 सदस्य देश, निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्राधान्यक्रमांच्या क्षेत्रांवर आधारित अंतर्गत बैठका इत्यादी कार्यक्रम झाले.

जागतिक डीपीआय शिखर परिषद(12-13 जून 2023)

जगभरातील 50 देशांतून आलेल्या सुमारे दीडशे परदेशी प्रतिनिधींसह एकूण अडीचशेहून अधिक प्रतिनिधी या शिखर परिषदेला प्रत्यक्ष उपस्थित होते. दोन हजारांहून अधिक व्यक्तींनी ऑनलाईन पद्धतीने या परिषदेत भाग घेतला. या शिखर परिषदेमध्ये, भारताने ‘इंडिया स्टॅक’ अर्थात लोकसंख्येच्या प्रमाणात लागू करण्यात आलेल्या यशस्वी डिजिटल उपाययोजना सामायिक करण्यासंदर्भात आर्मेनिया, सिएरा लिओन, सुरीनाम आणि अँटिग्वा तसेच बार्बुडा

या देशांशी सामंजस्य करार केले.

या शिखर परिषदेने क्षेत्र निरपेक्ष (पायाभूत) आणि क्षेत्रीय डीपीआयएस यांवर आधारित चर्चांसाठी जागतिक मंच उपलब्ध करून दिला. यामध्ये सहभागी झालेल्या डीपीआयएसशी संबंधित जागतिक पातळीवरील 60 तज्ञांनी इतर अनेक महत्त्वाच्या विषयांसह, नेतृत्व, धोरण आणि व्यवसायी पातळीवरील गहन, विचार प्रवर्तक आणि भविष्याला आकार देणारे  विचारमंथन केले. या चर्चा पुढील 10 महत्त्वपूर्ण सत्रांमध्ये विभागण्यात आल्या होत्या. ‘डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा’, ‘जनतेला सक्षम करण्यासाठी डिजिटल व्यक्तिमत्त्वे’, ‘डिजिटल भरणा आणि आर्थिक समावेशन’, ‘न्यायक्षेत्राशी संबंधित यंत्रणा आणि नियम यांसाठी डीपीआय’, ‘कार्यक्षम सेवा वितरणासाठी डिजिटल दस्तावेजांची देवाणघेवाण’, ‘डीपीआयसाठी महत्त्वाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधा’, ‘डिजिटल शिक्षण आणि कौशल्यविकास’, ‘डिजिटल आरोग्य आणि हवामान विषयक कृतींसाठी डीपीआय’, ‘डिजिटल कृषी परिसंस्था’ आणि ‘जागतिक डीपीआय परिसंस्थेची उभारणी’. जगातील 50 देश आणि विविध आंतरराष्ट्रीय संघटना यामधील डिजिटल निर्णयकर्त्यांसाठी डीपीआयसाठीचा जागतिक मंच उपलब्ध करून देऊन, भारताने याबाबतीत आघाडी घेतली आहे आणि ग्लोबल नॉर्थ  (जी-20 सदस्य देश) आणि ग्लोबल साउथ  (विकसनशील तसेच कमी आणि मध्यम उत्पन्न असलेले देश) यांच्या दरम्यान एक मजबूत सेतू म्हणून कार्य करण्याची भूमिका अधिक बळकट केली आहे. जागतिक डीपीआय शिखर परिषदेत आयोजित झालेल्या या चर्चासत्रांचे रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी कृपया पुढील लिंकचा वापर करा:

https://www.indiastack.global/global-dpi-summit/

जागतिक डीपीआय प्रदर्शन (12-14 जून 2023)

या प्रदर्शनात 14 विभाग होते. यामध्ये डिजिटल ओळख, फास्ट पेमेंट, डिजीलॉकर, मृदा आरोग्य कार्ड, ई-राष्ट्रीय कृषी बाजारपेठ, नव्या युगातील प्रशासनासाठी युनिफाइड मोबाईल अॅप, डिजिटल वाणिज्य व्यवहारांसाठी ओपन नेटवर्क, विमानतळावरील विनाव्यत्यय  प्रवासाचा अनुभव, भाषांतर, प्रशिक्षण उपाय, टेलि-मेडिकल सल्लामसलत आणि डिजिटल भारताचा प्रवास, या क्षेत्रांशी संबंधित यशस्वीपणे अंमलबजावणी झालेल्या डीपीआयची माहिती प्रदर्शित करण्यात आली होती. या प्रदर्शनाला, परिषदेसाठी आणि G20 डिजिटल अर्थव्यवस्था कार्य गटाच्या (DEWG) बैठकीला उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी भेट दिली. पुणे शहरातील व्यावसायिक, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांसह इतर नागरिकांनीही या प्रदर्शनाला भेट दिली.

G20 डीईडब्ल्यूजी (DEWG) ची बंद दरवाजा बैठक (13-14 June 2023)

G20 डीईडब्ल्यूजी बैठकीची बंद दरवाजा बैठक 13 जून 2023 रोजी सुरु झाली. यामध्ये  G20 सदस्य देश, 9 अतिथी देश, 5 आंतरराष्ट्रीय संस्था आणि दोन प्रादेशिक संघटनांच्या प्रतिनिधींसह एकूण 77 प्रतिनिधी सहभागी झाले. भारताच्या अध्यक्षतेखालील चर्चेचे नेतृत्व, डीईडब्ल्यूजी चे सह अध्यक्ष सुशील पाल यांनी केले. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (DPI) आणि चांगल्या डीपीआयच्या तत्त्वांचे पालन करण्यासाठी ‘एक भविष्य संघटना आणि एक भविष्य निधी’, आणि अल्प आणि मध्यम उत्पन्न देशांच्या (LMIC) डीपीआय साठी अर्थपुरवठ्याच्या संधींची गरज ओळखणे, या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. त्यानंतर, डिजिटल कौशल्य, कौशल्य विकास आणि पुनर्रकौशल्य विकास, क्षमता विकास आणि जागृती , डिजिटल कौशल्यांसाठी परस्पर ओळख चौकट तयार करणे आणि माहितीची देवाणघेवाण यावर चर्चा झाली.

बैठकीच्या शेवटच्या दिवशी, 14 जून 2023 रोजी, सुरक्षित, लवचिक आणि विश्वासार्ह डिजिटल अर्थव्यवस्थेची सुरक्षा या विषयावर आणि  लहान मुले आणि तरुणांची क्षमता विकास, आणि संभाव्य सुरक्षा जोखमीचा सामना करणे यासारख्या विविध मुद्यांवर चर्चा झाली.

गेल्या तीन दिवसांत, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आणि यामध्ये प्रतिनिधींना भारतीय संस्कृती, भारतीय खाद्य संस्कृती, भारतीय कला, योग आणि भारतातील लोक कला प्रकारांची अनुभूती मिळाली. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संपूर्ण सहकार्य आणि समन्वय प्रदान केल्याबद्दल भारत सरकार, महाराष्ट्र सरकारचे आभारी आहे.

पुढील टप्प्यात, डिजिटल अर्थव्यवस्था कार्य गट आणि डिजिटल अर्थव्यवस्था मंत्री यांची चौथी प्रत्यक्ष बैठक ऑगस्ट, 2023 मध्ये कर्नाटक मध्ये बंगळूरू येथे नियोजित आहे.