राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

Santosh Gaikwad August 06, 2023 04:45 PM

 

 पुणे, दि.6:  महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून निर्णयाचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे, असे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले.


 अजित पवार म्हणाले, कोविड काळाने आरोग्यसेवा सर्वात जास्त महत्वाची असल्याचे दाखवून दिले. राज्य शासनानेदेखील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत.  आरोग्यसेवेसाठी पुरवणी मागण्यांमध्ये 210 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात 700 ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 2 हजार 418 संस्थांमध्ये नि:शुल्क उपचार होणार आहेत. राज्यात ॲडेनो व्हायरसमुळे डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून पुण्यात साथीचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनी डोळ्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.


 पावसाळ्याचे दिवस असल्याने आरोग्य विभागामार्फत साथजन्य आजारांपासून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. साथीच्या आजारावर नियंत्रण करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून प्राथमिक टप्प्यातच अशा आजाराचे निदान झाल्यास रुग्णांचा त्रास कमी होतो. मात्र उपचारासोबत आजार होऊ नये यासाठी दररोज व्यायाम करणे, व्यसनापासून दूर राहणे, सकस आहार घेणे, वेळेवर आरोग्य तपासण्या करणे, तणावमुक्त जीवन जगणे गरजेचे आहे. प्रकृतीची काळजी घेताना जीवनशैलीत बदल आणायला हवा. आरोग्य शिबिरात मोफत वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. स्व. विनायक निम्हण यांनी सामाजिक कार्य करताना चांगल्या प्रकारची मैत्री जोपासली असेही पवार म्हणाले.