बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक ते मुख्यमंत्री : ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे निधन !

Santosh Gaikwad February 23, 2024 09:37 AM


मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे. दोन दिवसांपूर्वी मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर मुंबईच्या हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरू होते. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री असा त्यांचा यशस्वी राजकीय प्रवास होता. 

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे मुळचे बीडचे. त्यांचा जन्म २ डिसेंबर १९३७  मध्ये रायगड जिल्ह्याच्या नांदवी गावात एका मध्यमवर्गीय कुटूंबात झाला. शिक्षणासाठी मनोहर जोशी हे मुंबईमध्ये आले. एम. एची पदवी घेतल्यानंतर त्यांनी मुंबई नगरपालिकेत नोकरी सुरू केली. मात्र नोकरीपेक्षा व्यवसायात
 रस असल्याने त्यांनी कोहिनूर इंस्टिट्यूटची स्थापना केली.
 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनोहर जोशी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर ते २ टर्म नगरसेवकही होते. बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू, जवळचे मानले जाणारे मनोहर जोशी हे १९७६ ते १९७७ या काळात मुंबईचे महापौरही राहिले. 

 
मार्च १९९० ते डिसेंबर १९९१ विधानसभेचे विरोधी पक्षनेते, १९९५-९९ मध्ये भारतीय जनता पक्ष- शिवसेना युतीचा भगवा झेंडा विधानसभेवर फडकला. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यानंतर १९९९ ते २००२ या काळात केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री  ते लोकसभेचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. असा त्याचा चढता राजकीय प्रवास राहिला.  शेवटपर्यंत शिवसेनेसाठी त्यांनी आपले जीवन वाहिले. प्रबोधनकार ठाकरे ते आदित्य ठाकरे अशा ठाकरे घराण्याच्या चार पिढ्यांसोबत त्यांनी काम केले. त्यांच्या निधनानंतर बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.