सिंधुदुर्ग जिल्ह्यात साकारतेय 'फूड फॉरेस्ट'*

Ketan khedekar May 28, 2025 12:52 PM

मुंबई प्रतिनिधी 

 माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री.सुरेश प्रभू संस्थापक अध्यक्ष असलेल्या मानव साधन विकास संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 

प्रगतशील शेतकरी व पर्यावरण पूरक शेती क्षेत्रातील तज्ञ यांची एक विचार मंथन बैठक ओरोस येथे नुकतीच पार पडली. वातावरणातील बदलांनुसार आता शेतकऱ्यांनी शेती पद्धतीत बदल करून आपले अस्तित्व व आर्थिक उत्पादन क्षमता टिकवली पाहिजे. शेतकरी जगला तर जग जगेल. शेतकऱ्यांनी वातावरणातील अवास्तव कार्बन कमी करणारी शेतपिक किंवा बागायती लागवड केली तर जागतिक तापमान कमी करण्यासाठी नक्कीच हातभार लागेल असे मत सहकार क्षेत्रातील व जागतिक शेतकरी फोरम कार्यकारिणीवर कार्यरत असलेलं आपले माननीय श्री. सुरेश प्रभू यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आपले मत व्यक्त केले. मानव साधन विकास संस्था स्वतः पुढाकार घेऊन ओरोस येथे पाच एकर जागेवर,'मॉडेल फूड फॉरेस्ट' उभारित आहे, तेव्हा शेतकऱ्यांनी देखील आपापल्या जमिनींवर या संकल्पनेचे अनुकरण करावे व खऱ्या अर्थाने आपल्या शेतीत परिवर्तन घडवून आणावे असे आवाहनही त्यांनी केले.

 संस्थेच्या सद्याच्या विद्यमान अध्यक्षा सौ. उमा प्रभू यांनी मानव साधन विकास संस्था राबवीत असलेले विविध उपक्रम विशेषतः महिलांसाठी टेक्सटाइल अपसायकलिंग चा 'वृद्धी ' तर मच्छीमार बांधवांसाठी 'सिंधुपुत्र' अंतर्गत वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय संबंधित लाईफ सेविंग टेक्निक्स व पॉवर बोट हँडलिंग इत्यादी उपक्रमांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना शाश्वत उपजीविका निर्माण करण्यात संस्थेचे मोठे योगदान आहे. कोकणातील वाया जाणारा फणस हा व त्याची आधुनिक पद्धतीने केलेली शेती आर्थिक क्रांती घडवू शकेल. तसेच आता शेतकरी बांधवांना सक्षम करण्यासाठी संस्था राष्ट्रीय पातळीवरील प्रयोगशील यशस्वी तज्ञ शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनातून 'फूड फॉरेस्ट' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात साकारत आहे अशी माहिती त्यांनी दिली.

संस्थेचे जेष्ठ विश्वस्त डॉ. शरद सावंत यांनी परिवर्तन केंद्र संकल्पना व त्याचे तळागाळातील लक्ष घटकांवर होणारे दूरगामी सकारात्मक परिणाम विषद केले. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांनी आता पारंपारिक शेतीला जोड म्हणून जागतिक तसेच राष्ट्रीय पातळीवर यशस्वी ठरलेली 'फूड फॉरेस्ट' ही संकल्पना आपल्या जमिनींवर राबविणे ही काळाची गरज आहे. पर्यावरणाचा ऱ्हास न करता उपलब्ध पडीक, नापीक व जंगल जमिनींवर शेवगा, वाळा, काळी हळद, पानवेल व इतर स्थानिक फळझाडे यांची शास्त्रीय पद्धतीने लागवड करून आर्थिक वृद्धी करत देवस्वरूप निसर्ग देखील जपावा अशी माहिती श्री. पतंजलि झा व श्री. अरविंद जोशी या यशस्वी आयआयटीयन शेतकरी तज्ञ द्वयिनी दिली. श्री. पतंजली झा हे भारतीय महसूल सेवेतील (IRS) माजी अधिकारी असून कर्नाटक आणि गोवा राज्याचे आयकर महासंचालक आणि मुंबईचे मुख्य आयकर आयुक्त होते. तर श्री.अरविंद जोशी हे आयआयटी मुंबईचे पदवीधर आहेत आणि कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये होते. नाविन्यपूर्ण शेती करण्यासाठी त्यांनी सर्व सोडून ते पूर्णवेळ शेतकरी झाले. 

या शेतीविषयक विचारमंथन बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून श्री. सुर्यकांत कुंभार, डॉ. उत्तम फोंडेकर, प्रकाश गवस, कुमारी दर्शना पेडणेकर तसेच शेतकरी उत्पादक संस्थांशी संलग्न प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तज्ञां सोबत प्रश्न उत्तरांची चर्चा देखिल माहितीपूर्ण ठरली. 

या बैठकीत संस्थेच्या विश्वस्त सौ.अदिती सावंत, जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग चे अध्यक्ष श्री. मोहन होडवडेकर, ऍडव्होकेट श्री. नकुल पार्सेकर, नर्सिंग स्कूल चे संचालक श्री. योगेश प्रभू , जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग चे संचालक श्री. सुधीर पालव व सहकारी, परिवर्तन केंद्र चे श्री. संजय नाईक, ईतर मान्यवर व शेतकरी उपस्थित होते. परिवर्तन केंद्राचे जिल्हा समन्वयक श्री. विलास हडकर यांनी शेतकरी संपर्क तर संचालक श्री. नंदकिशोर परब यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. ओरोस येथील नियोजित फूड फॉरेस्ट जागेस तज्ञ व मान्यवर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या प्रकल्पास शुभेच्छा दिल्या. फूड फॉरेस्ट ही संकल्पना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल अशी पुष्टीही त्यांनी दिली. सहभागी संस्था जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग व मानव साधन विकास संस्थेच्या परिवर्तन केंद्र तर्फे सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.