दिवाळीत फक्त ३ तास फटाके फोडता येणार !

Santosh Gaikwad November 06, 2023 08:25 PM


मुंबई :    मुंबईत आवाज करणारे फटाके वाजवण्यास सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात यावी, असं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे. यासोबतच नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत. 

मुंबईतील वायू प्रदूषणाच्या पार्श्वभुमीवर हायकोर्टाने हे निर्देश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली आणि मुंबईतील वायू प्रदूषणाशी संबंधित रिपोर्ट्स येत आहेत. ज्यात या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत चालली असल्याचं सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर हायकोर्टाने या सूचना केल्या आहेत.   


 *दिवाळीपर्यंत मुंबईतील सर्व बांधकामे राहणार बंद*


मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे की, ''विकासकामांपेक्षा लोकांचे जीवन महत्त्वाचे आहे. काही दिवस बांधकाम थांबवले तर स्वर्ग कोसळणार नाही.'' राज्य सरकार आणि बीएमसीच्या वकिलांनी केलेल्या आवाहनानंतर हायकोर्टाने सांगितले की, आम्ही पुढील चार दिवस हवेच्या गुणवत्ता निर्देशांकावर लक्ष ठेवू. चार दिवसांनंतरही AQI कमी न झाल्यास पुढील चार दिवस सर्व विकासकामे थांबवण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. दरम्यान, बीएमसीला मुंबईतील 6,000 हून अधिक बांधकाम साइट्सवर प्रदूषण होत असल्याचं आढळलं आहे. यानंतर त्यांना 20 ऑक्टोबर रोजी वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामध्ये अँटी स्मॉग गन, बांधकामाच्या ठिकाणी फवारणी, दररोज पुनर्वापर केलेल्या पाण्याने सर्व 650 किमी प्रमुख रस्ते स्वच्छ करणे इत्यादींचा समावेश आहे.