नांदेड मृत्युप्रकरणी ३०२ चे गुन्हे दाखल करा : नाना पटोले

Santosh Gaikwad October 03, 2023 05:31 PM


मुंबई : नांदेड शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूनंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर चौफेर टीका होत आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. हे सरकारी अनास्थेचे बळी असून ३०२ चे गुन्हे दाखल करा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी केली आहे.


नाना पटोले म्हणाले की,  ठाण्यातील  कळव्याच्या सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणातून राज्य सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नाही. ठाण्यानंतर नांदेड   येथील रुग्णालयामध्ये ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयामध्ये २४ तासांत दोन नवजात बालकांसह १० जणांचा मृत्यू, या संताप आणणाऱ्या घटना आहेत. राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार लाजलज्जा सोडून दिलेले गेंड्याचे कातडीचे सरकार आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सरकारकडे स्वतःचे गुणगान गाणारे इव्हेंट करण्यासाठी, जाहीरातबाजी करण्यासाठी आणि आमदार खरेदीसाठी पैसे आहेत आणि सर्वसामान्य जनतेच्या औषधे खरेदीसाठी पैसे नाहीत का? असा संतप्त सवाल पटोले  यांनी केला आहे.


तसेच "राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला भ्रष्टाचाराच्या भस्म्या रोग झाला असून संपूर्ण यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे. सरकारी रुग्णालयात पुरेसे डॉक्टर व कर्मचारी नाहीत, औषधांचा तुटवडा आहे. रुग्णालयातील यंत्रसामुग्री नादुरुस्त असल्याने धुळ खात पडलेली आहे..." असे गंभीर आरोप यांनी यावेळी केले. "सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग ४० टक्क्यांची मलई खाण्यासाठी वेळेत औषधी खरेदी केली नाही. त्यामुळे २०२२ मध्ये तरतूद केलेला ६०० कोटींचा निधी परत गेला. भाजपा सरकारने १५ ऑगस्टपासून राज्यात मोफत आरोग्य सेवा सुरु केल्याचा मोठा गाजावाजा केला पण रुग्णालयात सरकार सेवा देत नसून मृत्यू देत आहे. भाजपा सरकारच्या काळात मरण स्वस्त झाले आहे हेच यावरून दिसत आहे...." अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.