शेतकरी वाऱ्यावर अन् मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर ; विरोधकांचे टीकास्त्र !

Santosh Gaikwad April 09, 2023 08:24 PM


मुंबई : राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातल्याने शेती पिकाच मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्याची उभी पीक भुईसपाट झाली आहेत. एकीकडे राज्यात अशी परिस्थिती असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्री, आमदार खासदारासह अयोध्या दौऱ्यावर असल्याने विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. 


मराठवाड्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्याचबरोबर कोकणासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे.अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्यातील शेती पिकांना बसला आहे. यामध्ये फळबागांचे मोठे  नुकसान झालं आहे. द्राक्ष, आंबा, केळी संत्रा, काजू या बागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. तसेच कलिंगड, गहू, कांदा, हरभरा, या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी राजा चितेत असून, नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहे.


दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. सकाळी मुख्यमंत्री लखनौ विमानतळावर दाखल झाले. त्यांच्या  स्वागतासाठी उत्तर प्रदेशात जोरदार तयारी करण्यात आली होती. लखनौ विमानतळावर एका बँड पथकाने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.  शिंदे यांच्यासोबत मंत्रिमंडळातील मंत्री, शिवसेना शिंदे गटाचे तसेच सहकारी भाजप चे आमदार, खासदार  उपस्थित होते. दुपारी शिंदे यांनी प्रभू श्रीरामाचे जन्मस्थळ असलेल्या राम लल्ला च्या मंदिरात महाआरती केली. त्यानंतर हनुमान गढी येथे जाऊनही दर्शन घेतल. तसेच जैन मंदिरात जाऊन भगवान महावीरांचे दर्शन घेतले. त्यांनंतर  भव्य राम मंदिराच्या बांधकामाची त्यांनी पाहणी केली. स्थापत्य वैशिष्टे जाणून घेतली. यावेळी अयोध्यामधील साधू सतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षाचं चिन्ह असलेलं धनुष्यबाण देऊन त्यांचं अयोध्यानगरीत स्वागत केलं. एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र शेतकरी राजा चिंतेत असताना त्याला आधार देण्याची गरज असताना त्यांना वाऱ्यावर सोडल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.

*दौऱ्यामुळे काहींना दु:ख झालं : एकनाथ शिंदे*

आमचं पूर्ण सरकार दर्शनाला आलं आहे. काही लोकांना हिंदुत्वाची एॅलर्जी आहे. आमच्या दौऱ्यामुळे काहींना दु:ख झालं. हा दौरा आमच्या साठी राजकारणाचा मुद्दा नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 'राम मंदिर हे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. तसेच अनेकांचं स्वप्न होतं. राम मंदिर हे हिदुंत्वाचं प्रतिक आहे. जगभरातून लोक अयोध्येत येत असतात. सर्वांची एक अपेक्षा आहे की, राम मंदिर झालं पाहिजे' असे शिंदे म्हणाले.

काय म्हणाले विरोधक


*आयोद्या दौरा म्हणजे मूळ प्रश्नांना बगल देणे :   शरद पवारांची टीका*

मुख्यमंत्री एका शिंदे यांच्या आयोध्या दौऱ्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली आहे. अयोद्या दौरा त्यांच्यासाठी महत्त्वाचा वाटतोय, त्यासाठी मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार, आमदार अयोध्येत जाऊन बसलेत. याचा अर्थ मूळ प्रश्नांना बगल देणे हेच आहे अशी टीका त्यांनी केली आहे. शरद पवार  हा श्रध्देचा प्रश्न असल्याचे सत्ताधाऱ्यांनी सांगत आहे, त्यांची श्रद्धा आयोध्देत आहे.  आमची श्रद्धा शेतकऱ्यांवर आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीशी निगडित आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसत, संकटातून त्याला मदत कशी करता येईल यावर आमची श्रद्धा आहे. प्रत्येकाचे धोरण वेगळे असू शकते अशी टोला शरद पवार यांनी लगावला आहे.


*सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला : संजय राऊत*

'हे सरकार धर्माच्या नावावर पर्यटनाला निघालं आहे. हे ढोंग असून प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद यांना अजिबात मिळणार नाही'', असं ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. अयोध्यातील साधू संतांनी शिंदे सरकाराला पाठिंबा दिला आहे. कालपर्यंत या साधू संतांचा आशीर्वाद उद्धव ठाकरे यांनाही होता. उद्या आम्ही मुख्यमंत्रीही होऊ, तेव्हा पुन्हा त्यांना आशीर्वाद असेल असेही राऊत म्हणाले.


*शेतकऱ्यांच्या रूपात रामलल्ला : बाळासाहेब थोरात* 

काँग्रेसचे नेते बळासाहेब थोरात यांनीही  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अयोध्येत आज रामलल्ला भेटणार नाही, राम लल्ला आज तरी शेतकऱ्यांकडे आहे. राज्यात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या रूपात राम लल्लाचे दर्शन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यां ना झाले असते असे थोरात म्हणाले.


*अयोध्याचे दर्शन उशिरा घेता आल असतं : रविकांत तुपकर*

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना रोमच्या राजाशी करत या दौऱ्यावर टीका केली आहे. रोम जळत असताना रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता, तशी अवस्था महाराष्ट्राची झाली आहे अशी टीका रविकांत तुपकर यानी केली आहे. वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री महोदय अनेक आमदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. हे अयोध्याचे दर्शन उशिरा सुद्धा घेता आल असतं. पण आज महाराष्ट्रातील  शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम सरकारच होतं.पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण हे सरकारच काम होत. अन्नदाता हा साक्षात परमेश्वर आहे. जिवंत माणसं सोडायची अन देवाच्या दर्शनाला पळायचं यापेक्षा अयोध्येचं दर्शन पुढच्या महिन्यात घेतलं असतं तरी चाललं असतं. आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जिवंत ठेवणे हे खऱ्या अर्थाने सरकारचं काम होत अशी टीका तुपकरांनी केली आहे.

****