सर्वकाही 'सेम टू सेम ' : शिंदेंची स्क्रिप्ट आता अजित पवारांच्या हाती !

Santosh Gaikwad July 03, 2023 07:10 PM

मुंबई - आम्हीच खरी शिवसेना, महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि पक्षाच्या वाढीसाठी आम्ही हा निर्णय घेतला असे शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने वर्षभरापूर्वी म्हटलं होतं.  आता त्याचीच पूनरावृत्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांच्या बंडानंतर दिसून येत आहे.  जी विधाने शिंदे गटातील नेत्यांनी फुटीनंतर केले होते, तीच विधाने अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल करत आहेत. अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत  आम्हीच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षवाढीसाठी आम्ही निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी आम्ही निर्णय घेतला आहे. पक्षातील पदाधिका-यांच्या नेमणुका त्यांनी केल्या.  त्यामुळे शिवसेनेचे बंड शिंदेंची स्क्रिप्ट आणि राष्ट्रवादीचे बंड पवार गटाची स्क्रिप्ट सर्वकाही सेम टूम सेमचा प्रत्यय दिसून येत आहे. 


सुनील तटकरे, चाकणकर नवे प्रदेशाध्यक्ष 

राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे.  दोन गटात विभागणी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा आहे? यावरून वाद सुरु झाला आहे. शरद पवार आणि अजित पवार असं दोघेही पक्षावर दावा ठोकत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. असं असताना अजित पवार यांनी आपल्या समर्थकांसह पत्रकार परिषद घेतली आणि त्यात पक्षाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.   प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारणीची घोषणा केली आहे. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच प्रफुल्ल पटेल यांनी विधीमंडळाच्या गटनेतेपदी अजित पवार तर प्रतोदपदी अनिल पाटील यांची   तर महिला प्रदेशाध्यक्षपदी रूपाली चाकणकर युवक प्रदेशाध्यक्षपदी सुरज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला. त्यावेळी त्यांनी   शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे म्हटले. 


सुप्रिया सुळे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करणार का? असा प्रश्न विचारला. त्यावरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं.”हकालपट्टी करण्यासाठी आमचा पक्ष काढलेला नाही. आम्ही बेरेजचं राजकारण करतो आणि पक्ष वाढवतो.आम्ही इथे काय हकालपट्टी करायला बसलो आहोत का?”, असं अजित पवार यांनी सांगितलं.  विरोधी पक्षनेता निवडण्याचं काम विधानसभेच्या अध्यक्षांना आहे. अपात्रतेची नोटीस देणं हे बेकायदेशीर आहे. आता महायुतीचं सरकार असून ते चांगलं काम  करेल. विधानसभा अध्यक्षांकडे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर आम्ही रविवारीच अपात्रतेची कारवाई करण्याचं पत्र दिलं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. या  पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, रुपाली चाकणकर, अमोल मिटकरी, अमोल मिटकरी हे उपस्थित होते.


शरद पवारांना अध्यक्ष  मानता तर त्यांनी केलेली कारवाई मान्य आहे का? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल 


अजित पवार गटाची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार  परिषद घेत प्रतिउत्तर दिले, आव्हाड म्हणाले की, काही जणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने पत्रकार परिषद घेतली.  त्या पत्रकार परिषदेत अध्यक्षाची निवड करण्यात आली. त्याला कायदेशीर संविधानिक मान्यता नव्हती. पार्टीच्या संविधानानुसार शरद पवार हेच अध्यक्ष आहेत. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या संविधानातून जन्माला आलेले नियम आव्हाडांनी वाचून दाखविले. अजित पवार गटाला विलिन होण्याशिवाय पर्याय नसल्याचे आव्हाड यावेळी म्हणाले.  पक्षाला नुकसान करणाऱ्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला काढण्याचा अधिकार पार्टी अध्यक्षाला आहे. यानुसार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबित करण्यात आले आहेत. तुम्हाला कायदेशीर मान्यता नाही असे आव्हाड म्हणाले.


आमचे नेते शरद पवार आहेत, असे तिथे सर्वच म्हणत होते. आता नैतिकतेचा प्रश्न उभा राहतो. जर तुम्ही शरद पवारांना अध्यक्ष  मानता तर त्यांनी केलेली कारवाई मान्य आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  एकजण म्हणत होते असा उल्लेख त्यांनी केला. ते एकजण म्हणजे शरद पवार आहेत. त्यांनी केलेल्या कोणत्याही नियुक्तीला मान्यता नाही. 'त्यांच्याकडे एकच पर्याय आहे, की त्यांनी शरद पवारांकडे यावं आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत असे सांगावं.', असे आव्हाड म्हणाले.  तोंडाला काळ फासा किंवा काहीही करा, रक्तात फक्त शरद पवार आहेत. तत्वांपासून आम्ही लांब राहणार नाहीत आणि शरद पवारांना सोडणार नाहीत,असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.