इंजि. डॉ. अनिलकुमार बी.गायकवाड यांचा जीवनगौरव सोहळा

Santosh Gaikwad April 23, 2024 11:00 AM


मुंबईः महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई चे उपाध्यक्ष तथा कार्यकारी संचालक इंजि. डॉ. अनिलकुमार बी.  गायकवाड यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन बांद्रा येथे दि. २४ एप्रिल २०२४ रोजी करण्यात आले आहे. हा सोहळा महाराष्ट्रातील विविध नामवंत संस्थांनी पुढाकार घेवून केले आहे. त्यात विक्रांद टाइम्स, अग्रसेन टाइम्स, शारदा ट्रस्ट, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषद, पुरोगामी प्रकाशन, गोल्डन पेज पब्लिकेशन अशा प्रसिध्द आणि नामवंत संस्थांचा समावेश आहे.


  या जीवन गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष  नरेंद्र वि. वाबळे हे भुषवणार आहेत तर या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महानंदा दुध संघाचे कार्यकारी संचालक  कान्हुराज बगाटे, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सीलचे अध्यक्ष असिफभाई कुरैशी, नागपूर येथील ताजुद्दीन बाबा दर्ग्याचे प्रमुख  तालेफबाबा व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एम.डी. शेख हे उपस्थित राहणार आहेत. या सन्मान सोहळ्याचे संयोजक छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील ज्येष्ठ पत्रकार अरुणकुमार एस. मुंदडा व पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार चांद शेख हे प्रास्ताविक करतील. 


  सत्कारमुर्ती असलेले इंजि. डॉ.  गायकवाड हे मराठवाड्यातील निलंग्यासारख्या ग्रामीण भागातून आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक या खुप जबाबदारीच्या पदापर्यंत पोहचले. त्यांचा अनुभव आणि प्रशासकीय कौशल्याचा उपयोग महाराष्ट्र राज्याला होत आहे.  महाराष्ट्रातील समृध्दी महामार्ग, कोस्टल रोड सारख्या अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प यांनी वेगाने तडीस लावलेली आहेत. कामावरील निष्ठा, सचोटी आणि प्रचंड अभ्यास ही त्यांची मुख्य वैशिष्टये आहेत. त्यांच्या याच गुणवैशिष्टयामुळे एक लोकप्रिय प्रशासक अशी त्यांची ओळख झालेली आहे. कामात प्रचंड व्यस्त असूनही आपले सामाजिक दायित्व ते वेळोवेळी निभावत असतात. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे संयोजक अरुणकुमार एस.मुंदडा आणि चांद शेख यांनी पुढाकार घेवून हा सोहळा आयोजित केला आहे.