सुरजागडातील लोह उत्खनन प्रकल्पात स्थानिकांना रोजगार : मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा

Santosh Gaikwad March 24, 2023 12:00 AM

मुंबई - गडचिरोली जिल्ह्यातील  सुरजागड येथे सुरू लोह उत्खनन प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पात स्थानिक लोकांना प्राधान्याने रोजगार देऊ, अशी घोषणा बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत केली. गेल्या काही वर्षांपासून सुरजागड येथे लोह उत्खनन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. अवैध उत्खनन या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. स्थानिक लोकांना रोजगार दिला जात नाही. ज्या कंपनीद्वारे उत्खनन होत आहे, त्याठिकाणी संगणक प्रणालीद्वारे डॅशबोर्ड तयार केले जाईल. सीसीटीव्ही कॅमेरा आणि सीसीटीव्हीच्या मदतीने उत्खननाचे काम तपासावे, अशी चर्चा कॉंग्रेसचे सदस्य अभिजित वंजारी यांनी नियम ९२ अन्वये घडवून आणली. मंत्री भुसे यांनी यावर स्पष्टीकरण दिले.


सुरजागड - एटापल्ली येथे लोहखनिज उत्खननाला 1993 पासून सुरुवात झाली. सन २००७ मध्ये मेसर्स लाईट मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड या कंपनीला काम दिले आहे. ज्या कंपनीद्वारे लोह खनिज उत्खनन सुरू आहे. पाच वर्षे त्यांच्या कामांची रूपरेषा ठरलेली आहे. 2008 -2009 ते 2020-21 या काळात सुमारे 4 लाख 49 हजार 463 टन इतके लोह उत्खनन केल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले. तसेच 2021- 22 आणि 23 या वर्षात 57 लाख 59 हजार 528 टन इतके लोह खनिज उत्खनन केले होते. मोठ्या प्रमाणात या खाणीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली जाणार असून 3209 लोकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा, मंत्री भुसे यांनी केला.


घुगुसाच्या खाणीत प्रतिदिन 900 टन उत्खनन होत आहे. त्या ठिकाणी 1 हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पाची क्षमता 1300 टन पर्यंत वाढवून रोज उत्खनन केले जाईल. तसेच या ठिकाणी दोन हजार रोजगार वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच घोणसरी प्रकल्प एप्रिल-मे महिन्यामध्ये कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 1500 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. येथील खाणीमधून सुमारे 50 टक्के स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिल्याचे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले. घोणसरी प्रकल्पात स्थानिक प्रशासनाने कार्यवाही सुरु केली असून या खाणीतून स्वामीत्वधन पोटी (रॉयल्टी पोटी) 390.10 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. तसेच डी. एम. एम. फंडासाठी 107.50 कोटी निधी प्राप्त झाला असून एन मेट या फंडासाठी 6.42 कोटी मिळाल्याचे मंत्री भुसे यांनी परिषदेत सांगितले. सी एस आर मधून 6.25 कोटींची कामे केली आहेत. परंतु, या खाण प्रकल्पात त्रुटी आढळून आल्यास त्यावर कठोर कार्यवाही करणार असल्याचे मंत्री भुसे म्हणाले.