मातोश्रीतून बाळासाहेबांची डरकाळी ऐकू यायची, आता रडगाणे आणि शिव्याशाप ऐकू येतात : एकनाथ शिंदे यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल

Santosh Gaikwad February 17, 2024 04:19 PM


कोल्हापूर : मातोश्री हे बाळासाहेब असताना पवित्र मंदिर होतं. आता ती उदास हवेली झाली आहे. आज तुम्ही कसं वागत आहात. मातोश्रीतून वाघाची डरकाळी ऐकू यायची तिथून आता रडगाणी ऐकू येतात, शिव्याशाप ऐकू येतात अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला. शिवसेना शिंदे गटाचे दोन दिवसीय महाअधिवेशन कोल्हापूर येथे आयेाजित करण्यात आले असून  अधिवेशनाच्या दुस-या दिवशी कार्यकत्यांना संबोधित करताना शिंदे यांनी ठाकरेंवर जोरदार प्रहार केला.  


महाअधिवेशनात भाषण करताना शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ठाकरे गटाची साथ सोडणाऱ्यांवर टीका करण्यात येत आहे. पण एक दिवस सोडून जाणारे हेच कार्यकर्ते आणि हा महाराष्ट्र तुम्हाला कचऱ्यात टाकल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर तुम्ही दोघेच राहाल, असा घणाघात शिंदे यांनी केला आहे. 


बाळासाहेब आणि कोल्हापूरच अतूट नाते 

कोल्हापुरातील महाअधिवेशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या करवीर भूमीत आपले महाअधिवेशन होत आहे. महाअधिवेशनामुळे कोल्हापुरात भगवे वादळ आले आहे. शिवसेनेचे शक्तीपीठ अवतरले आहे. बाळासाहेब देखील महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कामाला सुरुवात करायचे, आपणही त्याचे पालन केले. बाळासाहेब आणि कोल्हापूरचे अतूट नाते आहे. तुमच्यामुळे शिवसेना ताकदीने उभी राहिली आहे. आज समाधान आहे की, आपला शिवसेना पक्ष पुढे जात आहे, मोठा होत आहे. आपली शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडे आहे, ही जमेची बाजू आहे. सत्याचा नेहमी विजय होत असतो, त्यामुळे हे आज आपल्याकडे आहे.


वारसा सांगणा-यांनी आरशात बघा !

 बाळासाहेबांचे राम मंदिराचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले. त्यासाठी आपण त्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला. सहकार क्षेत्रातील कामामुळे अमित शहा यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला.  आज बाळासाहेब असते तर राम मंदिर पूर्ण होताना आणि कलम 370 हटवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतूक केले असते. परंतु जे वारसा सांगता आहेत, त्यांनी एकही शब्दही उच्चारला नाही. यामुळे हिंदुत्व सांगण्याची तुमच्याकडे नैतिकता नाही असे शिंदे म्हणाले. 


महाराष्ट्र तुम्हाला कचरा केल्याशिवाय राहणार नाही 

तुमच्याकडे एखादी व्यक्ती जोपर्यंत असते, तोपर्यंत तो व्यक्ती चांगला असतो. परंतु गेल्यावर तो कचरा होतो. तो गद्दार होतो. आता एकेदिवशी हा महाराष्ट्र आणि गेलेले कार्यकर्ते तुम्हाला कचरा केल्याशिवाय राहणार नाही, असा घाणाघात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केला. आज त्यांनी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करायला हवे, हे त्यांना आपण सांगायची गरज नाही, तर त्यांना हे कळले पाहिजे, असा सल्ला शिंदेनी दिला.


 उध्दव ठाकरेंमागे अनेक चेहरे 

"एका पक्ष प्रमुखाला हा सत्तेचा मोह आज नाही २०१४ पासून होता. मी पदाला हापापलो नव्हतो, मला सांगितलं असतं तर मी तसं वातावरण केलं असतं. उद्धव ठाकरे दिसतात तसे नाही, त्याच्या मागे अनेक चेहरे आहेत. सत्तेच्या एका खुर्चीपाई यांनी बेईमानी केली. तुमच्या परिवारावर काही घडल़ तेव्हा तुम्ही अशोक चव्हाण व अजित पवारांसोबत गेलात. आजचं अधिवेशन बघा शेवटची खुर्ची भरलेली आहे, वारसा सांगणाऱ्यांनी कधी तरी आरसा पाहावा," अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केली.


सत्तेच्या मोहापायी बाळासाहेबांचे विचार आचार सोडले

रोज सांगायचं बाप चोरला, बाप चोरला. बाळासाहेब ठाकरे हे कुणा एकट्या दुकट्याची मक्तेदारी नव्हती. बाळासाहेब तमाम शिवसैनिकांसाठी दैवत होतं त्या दैवताचं पुण्यत्व तुम्ही विकलंत. सत्तेच्या मोहापायी आणि खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार आणि आचार सोडले. यांना मोह झाला आणि स्वार्थ झाला होता. नवा कार्यक्रम चुकीचा आहे हे तेव्हाच सांगितलं होतं. असंही एकनाथ शिंदे म्हणाले.