राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश तर नरहरी झिरवळ नॉट रीचेबल

Santosh Sakpal May 11, 2023 10:12 AM

मुंबई : एकीकडे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल येणार असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. ANI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. तर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल झाले आहेत.

आयएल आणि एफएस या प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. जयंत पाटील यांना आलेल्या ईडी नोटीसमुळे विविध चर्चा रंगल्या आहेत. जयंत पाटील यांना जाणीवपूर्वक ही नोटीस बजावण्यात आली आहे अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रंगली आहे. मात्र जयंत पाटील यांना ईडीची नोटीस येणं हा योगायोग आहे असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. तर नरहरी झिरवळ शरद पवार यांच्या सांगण्यावरून झिरवळ नॉट रीचेबल झाले असावेत, असेही सामंत म्हणाले.

IL & FS प्रकरण नेमकं काय आहे?

आयएल आणि एफएस या कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू होती. या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. या आधीही या कंपनी प्रकरणी राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे.

विद्या चव्हाण यांची भाजपावर टीका

राष्ट्रवादीच्या नेत्यांना ईडीची नोटीस येणं हे काही नवीन राहिलेलं नाही. यापूर्वी जयंत पाटलांना ईडीकडून कोणतीही नोटीस आलेली नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनाही त्रास देण्याचं काम भाजपाने सुरू केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केला आहे. या चौकशीतून काहीही समोर येणार नाही. अशा नोटीसा अनेक नेत्यांना आलेल्या आहेत. अशा नोटीसा शरद पवारांपासून अनेक नेत्यांना अशा नोटीसा आल्या आहेत. त्यामुळे या नोटीसांमुळे राष्ट्रवादी कमकुवत होण्याऐवजी आणखी भक्कम होत आहे, असंही विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे.