माजी महापौर किशोरी पेडणेकर, संदीप राऊत यांची आज ईडी चौकशी !

Santosh Gaikwad January 30, 2024 09:52 AM


मुंबई : कोराना काळातील खिचडी घोटाळा आणि कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आज 30 जानेवारी रोजी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. मागील आठवड्यात ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची ईडीने नऊ तास चौकशी केली. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते ईडी च्या रडावर असल्याचे दिसून येत आहे.


मागील काही दिवसांपासून मुंबई महानगर पालिकेतील कथित बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी अनेकांची चौकशी सुरू आहे. यामध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचाही समावेश असल्याने त्यांना आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे. बॉडीबॅग २ हजार रुपयांऐवजी सहा हजार ८०० रुपयांना खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला होता. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचाही आरोप ईडीने केला होता. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या. त्यामुळे याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

याच दरम्यान कोरोना काळात महानगर पालिकेकडून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना खिचडीचे वाटप करण्याची योजना राबविली होती. यात मोठ्या प्रमाणावर भष्ट्राचार झाल्याचा आरोप करून आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी तपास सुरू केला होता. याच प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे अमोल किर्तिकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सूरज चव्हाण यांची पोलिसांकडून चौकशी झाली होती. या चौकशीत ४५ लाख रुपये सह्याद्री रिफ्रेशमेंटने सल्लागार सेवा देण्यासाठी सुजित पाटकर यांना दिले होते. त्यात संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे त्यांनाही आज चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे. त्यामुळे या चौकशीतून काय बाहेर येतं याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
---