दसरा मेळावा : आझाद मैदानात हिंदुत्वाचा हुंकार !

Santosh Gaikwad October 23, 2023 11:26 PM

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी दोन लाख शिवसैनिक येणार :नरेश म्हस्के

मुंबई : शिवसेनेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आझाद मैदानामध्ये दसरा मेळावा होणार आहे.या मेळाव्यामध्ये शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून दोन लाखांपेक्षा जास्त शिवसैनिक मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत.ज्वलंत हिंदुत्वाचा हुंकार आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या परंपरेची पुनरावृत्ती या दसरा मेळाव्यातून होणार आहे अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र प्रदेश समन्वयक नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रवक्ते राहुल लोंढे, शीतल म्हात्रे उपस्थित होते.


 शिवसेनेचे प्रवक्ते  नरेश म्हस्के यांनी आझाद मैदान येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याची माहिती देताना नरेश म्हस्के म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रभरातून शिवसैनिक या दसरा मेळाव्यासाठी ५२०० पेक्षा जास्त घेऊन येणार आहेत. तसेच सुमारे ८-१० हजार छोट्या चारचाकी वाहनांमधून शिवसैनिक या दसरा मेळाव्यासाठी येणार आहेत. या आकड्यांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. त्याच प्रमाणे या मेळाव्यासाठी विदर्भातून २ स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहेत. तसेच नागपूर जवळील भागातून सुद्धा बहुसंख्य लोक रेल्वेने लोक येणार आहेत.


दसरा मेळाव्याला मुंबई बाहेरून येणाऱ्या लोकांकरिता वाशी, मुलुंड, पडघा, दहिसर चेकनाका येथे चहापान व अल्पोपहार याची व्यवस्था केलेली आहे. तसेच आझाद मैदानाच्या बाजूच्या मैदानात सुद्धा तशी व्यवस्था केलेली आहे. येणाऱ्या ज्या बसेस आहेत त्यामधील कोकणातून येणाऱ्या बसमधून येणारे शिवसैनिक बॅलार्ड इस्टेट येथे उतरतील आणि कनार्क बंदर, जीआरपी कमिश्नर ऑफिस रोड येथे त्यांचे पार्किंग होणार आहे. मुंबई-ठाण्यातून ज्या बसेस येणार आहेत, त्यातील शिवसैनिक हे बॅलार्ड इस्टेट येथे उतरतील व त्यांना कॉटन ग्रीन येथे पार्किंग दिले आहे. पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसमधील शिवसैनिक हर्निमन सर्कल येथे उतरतील, तर भाऊचा धक्का येथे त्या बसेसना पार्किंग दिलेले आहे.


मराठवाडा व विदर्भातून येणाऱ्या बसेसमधून येणारे शिवसैनिक गेट ११ येथे उतरतील आणि शिवडी बीपीटी पार्किंग येथे त्या बसेसना पार्किंग दिलेले आहे. छोट्या चारचाकी वाहनांकरिता त्यातील मुंबई-ठाणे व कोकणातून येणाऱ्या वाहनांकरिता विधानभवन, एनसीपीए व मनोरा आमदार निवास या ठिकाणी पार्किंग असेल व कुलाबा येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ त्यांना पिकअप आणि ड्रॉप असणार आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या छोट्या वाहनांकरिता हर्निमन सर्कल, फोर्ट लेन व बॅलार्ड इस्टेट येथे पार्किंग असणार आहे आणि हर्निमन सर्कल येथे पिकअप आणि ड्रॉप ची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातुन येणाऱ्या छोट्या वाहनांकरिता दाणाबंदर, रोरो भाऊचा धक्का, शिवडी ए ब्लॉक बीपीटी रोड येथे पार्किंग असून, पिकअप आणि ड्रॉप गेट क्र. १८ येथे असणार आहे. पार्किंग आणि पिकअप आणि ड्रॉपची व्यवस्था अशा प्रकारे केली गेली आहे, जेणेकरून शहरातील नागरिकांना त्रास होणार नाही आणि गर्दीचे नियोजन योग्य प्रकारे करता येईल. 


मेळाव्यासाठी आझाद मैदानामध्ये वैद्यकीय सुविधेसाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ५० डॉक्टरांची व्यवस्था केलेली आहे. त्याच बरोबर कार्डियाक अँब्यूलन्स, नियमित अँब्यूलन्सची व्यवस्था केलेली आहे. त्याच प्रमाणे कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून फायरब्रिगेडची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. 


सर्वसामान्य शिवसैनिकांना मुंबई महापालिका कार्यालयासमोरील गेट क्र.१,२ व ३ तसेच मेट्रो सिनेमा समोरील गेट क्र. ४ येथून प्रवेश दिला जाईल तर अतिमहत्वाच्या व्यक्तींना गेट क्र. ५ मधून प्रवेश दिला जाईल. तसेच मीडियाकर्मींना मुंबई जिमखाना येथील गेट क्र. ६ येथून प्रवेश असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व शिवसैनिकांना शांततामय मार्गाने व शिस्तपालन करून मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचे, तसेच आपल्यामुळे कुणाला काही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती नरेश म्हस्के यांनी दिली आहे.