लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी.., बापाचा नाद करायचा नाही : सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना ठणकावले

Santosh Gaikwad July 05, 2023 06:24 PM


मुंबई : अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाने वेगवेगळया मेळाव्यातून शक्तीप्रद्रर्शन केले. शरद पवार यांचा मेळावा यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडला त्यावेळी पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाषण केले.श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. बाकी कुणावरही बोला पण बाप आणि आईचा नाद नाही करायचा असं खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ठणकावलं. पक्षातल्या वडीलधाऱ्यांना सांगताय की तुमचं वय झालं, आता थांबा, अरे यांच्यापेक्षा आम्ही मुली बऱ्या, जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा तीच अहिल्या होते आणि ताराराणी होते असंही त्या म्हणाल्या.  


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मेळावा पार पडला. पवारांच्या या बैठकीला एकूण १२ आमदार उपस्थित होते. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे हे प्रमुख नेतेही उपस्थित झाले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिसून आला. यावेळी मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 


वांद्रे येथील झालेल्या बैठकीत अजित पवार गटाने शक्तीप्रदर्शन केले. त्यावेळी अजित पवारांनी अनेक गौप्यस्फोट करत शरद पवारांवरही टीकास्त्र सोडले. वय जास्त झालं. 82 झालं , 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? तुम्ही आशीर्वाद द्या. तुम्ही शतायुषी व्हा, असे अजित पवार म्हणाले होते. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना खडे बोल सुनावले.  सुळे म्हणाल्या की, ''जेव्हा घरावर जेव्हा अडचण येते तेव्हा आई वडिलांसोबत सर्वात आधी लेक उभी राहते. रतन टाटा या वयातही काम करतात. वयाची 80 वर्ष उलटल्यानंतरही अमिताभ बच्चन हे जाहिरातीत आणि मोठ्या पडद्यावर दिसतात ना, याचा दाखला सुप्रिया सुळे यांनी दिला. आपल्या वडिलांना म्हणायचं की, तुम्ही घरी बसा आणि आशीर्वाद द्या ,असं म्हणणाऱ्या पोरांपेक्षा मुलीच चांगल्या, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांना सुनावलं. 


 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ''ना खाऊंगा ना खाने दुंगा बोलणाऱ्या भाजपविरोधात आता लढाई सुरु झाली आहे. कैसे तुमने खाया आज के बाद तुमको महाराष्ट्र मे खाने नही दुंगी' आठ नऊ खुर्च्या मोकळ्या झाल्या आहेत त्यावर नवीन लोकांना संधी मिळेल. आता राष्ट्रवादीचा एकच शिक्का आणि त्याचं नाव..शरद पवार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.