बीड आणि ठाण्यात ठाकरे़ - शिंदे गटाचे कार्यकर्ते आपआपसातच भिडले ..

Santosh Gaikwad May 19, 2023 06:28 PM

ठाणे : एकीकडे बीडमध्ये ठाकरे गटाच्या वाद विकोपाला गेला असताना, आता दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. ठाकरे आणि शिंदे गट आपआपसात भिडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटात चाललंय तरी काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. 


ठाण्यातील वर्तक नगर परिसरात सुरू असणाऱ्या बांधकाम साईटवरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक गट आणि माजी गटनेते दिलीप बारटक्के गट पुन्हा एकदा आपापसात भिडले. वर्तकनगर प्रभाग समिती समोरील बिर्ला कम्पनी येथील बांधकाम कंत्राट वरून या दोन्ही गटांमध्ये अनेक महिन्यापासून वाद सुरू आहे. आज या बांधकाम साईटवरून काही डंपर जात असताना सरनाईक गटाच्या कार्यकर्त्यांनी डंपरला अडवून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यात डंपर च्या पुढील भागाचे नुकसान झाले. यावेळी दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. घटनास्थळी मोठा जमाव जमून काही काळ वातावरण तंग झाले होते. मात्र, तात्काळ पोलिसांनी दोन्ही गटाला पांगवले असून सध्या त्या ठिकाणी दोन्ही बाजूने कार्यकर्ते ठाण मांडून बसले आहेत. दरम्यान याप्रकरणी आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः मध्यस्थी करून हा वाद मिटवावा अशी मागणी करण्यात येते आहे.

 

बीडमध्ये ठाकरे गटात वाद


बीडमध्ये उद्या २० मे ठाकरे गटाची  महाप्रबोधन यात्रा होणार आहे. मात्र या यात्रेआधीच ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा वाद चव्हाट्यावर आलाय. ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कार्यकर्त्यांकडून दोन-दोन लाख रुपये मागत होत्या. म्हणून त्यांना कानशिलात लगावल्याचा दावा माजी जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी मात्र, असं काहीच घडलं नसून ही शिंदे गटाने लिहलेही स्क्रीप्ट असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांना मारहाण झाल्याचा दावा पुढे आल्यानंतर राजकीय क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांचं निलंबन करण्यात आलं आहे.