औषधांच्या तुटवड्यामुळे रूग्णालयात रुग्णांचे मृत्यू महाराष्ट्राच्या प्रतिमेला न शोभणारे : रामदास आठवले

Santosh Gaikwad October 04, 2023 06:08 PM


 मुंबई दि. ४- नांदेड आणि औरंगाबाद मधील सरकारी रुग्णालयात औषधांच्या तुटवड्यामुळे ४५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची अंत्यत दु:खद; वेदनादायक दुर्घटना घडली आहे. औषधांच्या तुटवड्यामुळे सरकारी रुग्णालयात रुग्णांचे मृत्यू होणे प्रगतीशिल महाराष्ट्राच्या प्रतिमेला शोभणारी बाब नाही. सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करुन दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
                 

नांदेडच्या डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात ३५ रुग्णांचा पुरेशा औषधा अभावी मृत्यु झाल्याची दुर्घटना उघडकिस आल्यानंतर लगेच औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात १० रुग्णांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. औषधाविना ४५ रुग्णांचे मृत्यु होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. नांदेड आणि औरंगाबाद मधील रुग्णालयात झालेल्या दुर्घटनांची सखोल चौकशी करण्यात यावी.या पार्श्वभूमिवर महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांची तपासणी करण्यात यावी तसेच यापूर्वी रुग्णालयात आग लागल्याच्या ही दुर्घटना घडल्या आहेत. सर्व रुग्णालयाचे फायर ऑडिट केले पाहिजे.राज्य शासनाने सर्व रुग्णालयात औषधे आणि यंत्रणांचा पुरवठा सुरळीत ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. यात कर्तव्यात कसुर करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांना  कठोर शिक्षा केली पाहिजे अशी मागणी   रामदास आठवले यांनी केली आहे.