मुंबई, : "क्रिकेटच्या वेगवेगळ्या फॉरमॅटशी चटकन जुळवून घेता येणे गरजेचे आहे असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी १६ वर्षंखालील मुलांच्या ड्रीम११ कप क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलताना व्यक्त केले. हल्ली मुलांना दोन दिवसाचे सामने, ४५ षटके आणि टी २० अशा विविध फॉरमॅट मध्ये खेळावे लागते. त्यामुळे प्रत्येक फॉरमॅट मध्ये खेळताना जेवढ्या लवकर तुम्ही त्या फॉर्मॅटशी जुळवून घ्याल तेवढे जास्त यश तुम्हाला मिळेल असे वेंगसरकर यांनी सांगितले. यावेळी मुंबईच्या १६ वर्षाखालील मुलांच्या निवडसमितीचे गोटखिंडीकर, १९ वर्षाखालील मुलांच्या निवडसमितीचे रवी गाडियार आणि ड्रीम ११ चे साहिल देसाई आणि प्रशांत तायडे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत गणेश पालकर क्रिकेट क्लब संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत बलाढ्य एम.आय.जी. संघावर एका विकेटने निसटता विजय मिळवत विजेतेपदाचा मान मिळविला. कर्णधार शतकवीर अभिज्ञान कुंडू हा त्यांच्या यशाचा शिल्पकार ठरला.
दरम्यान प्रथम फलंदाजी करणाऱ्या एम.आय जी.संघाने निर्धारित ३५ षटकांत ५ बाद १९४ धावांचे लक्ष्य उभारले. सलामीवीर तनीश शेट्टी (९२) आणि संचित कदम (४६) यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेली ११८ धावांची भागीदारी महत्वपूर्ण ठरली. तनिषने ११६ चेंडूत ८ चौकार आणि एका षट्काराच्या साहाय्याने ९२ धावा फाटकावल्या. जी.पी.सी.सी. संघाच्या तन्वीर चौहान याने २९ धावांत ३ बळी मिळविले. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या कर्णधार अभिज्ञान कुंडूने (१०१) ४९ चेंडूंतच १२ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने शतकी खेळी केली. तन्वीर चौहानच्या (२१) साथीने त्याने दुसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भागी रचून विजयाच्या दिशेने कूच केली होती. मात्र ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्याने त्यांची ९ बाद १९४ अशी अवस्था होती. मात्र आर्यन प्रभाकर याने नाबाद १४ धावा करीत संघाला विजयपथावर नेले. तनीश शेट्टी याने २५ धावांत ३ तर सचिर्थ पुजारी याने २६/२ बळी मिळवत त्यांच्या तोंडचे पाणी पळविले होते.
चार सामन्यात दोन शतके आणि एक अर्धशतकासह ३१४ धाव करणाऱ्या अभिज्ञान कुंडू याला स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून तर तीन सामन्यात ११ बळी (त्यात एकदा ५ बळी) मिळविणाऱ्या जतिन जेठवा याला स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून तनीश शेट्टी (४ सामन्यात दोन अर्धशतकांसह २२ धावा आणि ६ बळी) याची निवड करण्यात आली. दिलीप वेंगसरकर, ड्रीम ११ चे साहिल देसाई, रवी गाडियार आणि गोटखिंडीकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक :- एम.आय.जी. - ३५ षटकांत ५ बाद १९४ (तनीश शेट्टी ९२, आयुष मकवाना १४, संचित कदम ४६, नाथानील परेरा नाबाद १८ ; तन्वीर चौहान २९/३) पराभूत वि. गणेश पालकर क्रिकेट क्लब - ३२ षटकांत ९ बाद १९५ (अभिज्ञान कुंडू १०१, तन्वीर चौहान २१, आर्यन प्रभाकर १४, तनीश शेट्टी २५/३, सचिर्थ पुजारी २६/२)