दिलीप करंगुटकर स्मृती शालेय कॅरम स्पर्धेत ३८ खेळाडूंमध्ये आज चुरस

Santosh Sakpal April 05, 2024 07:56 PM


   आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे क्रीडा सल्लागार स्व. दिलीप करंगुटकर यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त ६ एप्रिल रोजी भायखळा येथे होणाऱ्या विनाशुल्क शालेय कॅरम स्पर्धेत मुंबईसह विविध जिल्ह्यातील उदयोन्मुख ३८ खेळाडूंमध्ये विजेतेपद पटकाविण्यासाठी चुरस होणार आहे. १५ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या एकेरी कॅरम स्पर्धेतील पहिल्या आठ विजेत्यांना आकर्षक चषक-पदक व स्ट्रायकर देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन क्रीडाप्रेमी राजेश सुर्वे यांच्या तर बक्षीस समारंभ डॉ. विशाल मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-जेजे परिसर व अविनाश स्पोर्ट्स यांचे स्पर्धेला सहकार्य लाभले आहे. 



   क्रीडा व सामाजिक सेवाभावी कार्यकर्ते स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक पटकाविण्यासाठी आर्यन स्कूल-पुणेचा आयुष गरुड, पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर, इझाक न्यूटन ग्लोबल स्कूल-वसईचा श्रीशान पालवणकर, डॉ. अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूल-दादरचा रुद्र भालेराव, एमपीएस-वरळीचा सिध्दांत मोरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय-वरळीचा समीर खान, पोद्दार अकॅडमी-मालाडचा प्रसन्ना गोळे आदी उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू पूर्ण तयारीनिशी स्पर्धेत उतरले आहेत. परिणामी कॅरम रसिकांना अटीतटीच्या लढती पाहण्यास मिळतील. पंचाचे कामकाज नामवंत राष्ट्रीय दर्जाचे पंच प्रणेश पवार तसेच क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, चंद्रकांत करंगुटकर पाहणार आहेत. 


         ************************