स्व. दिलीप करंगुटकर स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धा आजपासून

Santosh sakpal April 02, 2023 03:34 PM

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप तर्फे सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ-भायखळा सहकार्याने क्रीडाप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा ३ एप्रिलपासून शिवाजी पार्क मैदानात सुरु होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन मुंबई क्रिकेट संघटनेचे अपेक्स कौन्सिल मेंबर अभय हडप यांच्या हस्ते कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल-नवी मुंबई विरुध्द ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल आणि कस्तुरबा हॉस्पिटल विरुध्द सेव्हन हिल्स हॉस्पिटल यामधील लढतीने होईल. यावेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, क्रिकेटपटू अनंत सुर्वे, अनिकेत करंगुटकर, चंद्रकांत करंगुटकर, संदीप दळवी, प्रदीप क्षीरसागर, मनोहर पाटेकर आदी क्रिकेटपटू उपस्थित राहणार आहेत.  


   उद्घाटनीय लढतीमध्ये ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचे कप्तान प्रदीप क्षीरसागर, रोहन महाडिक, शंतनू मोरे, प्रफुल मारू विरुध्द केडीए-नवी मुंबई संघाचे कप्तान संदीप देशमुख, अष्टपैलू मिल्टन लोबो, अब्दुल अन्सारी आदींच्या खेळावर सलामीचा विजय अवलंबून असेल. दुसऱ्या साखळी सामन्यातील विजयी मदार कस्तुरबा हॉस्पिटलचे कप्तान रोहन ख्रिस्तियन, अष्टपैलू डॉ. परमेश्वर मुंढे, अंकुश जाधव, महेश सणगर आदींच्या विरुध्द सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे कप्तान डॉ. हर्षद जाधव, डॉ. मनोज यादव, यष्टीरक्षक डॉ.इब्राहीम शेख, अष्टपैलू सुशांत गुरव आदींच्या खेळावर राहील. ही स्पर्धा प्रथम साखळी व त्यानंतर बाद पध्दतीने शिवाजी पार्क मैदानातील माहीम ज्युवेनाईल खेळपट्टीवर १८ एप्रिलपर्यंत रंगणार आहे. स्पर्धेनिमित्त रुग्णालयीन क्रिकेटपटू रहेजा हॉस्पिटलचे चेतन सुर्वे, केडीए हॉस्पिटलचे ओमकार पाटील, जसलोक हॉस्पिटलचे श्रीकांत दुधवडकर व जे.जे. हॉस्पिटलचे इक्बाल सय्यद यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.