ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने दिलीप करंगुटकर स्मृती चषक जिंकला

Santosh Sakpal April 19, 2023 05:16 AM

मुंबई :  ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने कस्तुरबा हॉस्पिटलचा ५ विकेटने पराभव करून आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुपतर्फे सार्वजनिक नवरात्र महोत्सव-जेजे सहकार्याने झालेली क्रीडाप्रेमी स्व. दिलीप करंगुटकर स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा जिंकली. कप्तान प्रदीप क्षीरसागर, जय तामोरे, सुदेश यादव, इसाकी मुत्तू यांच्या दमदार खेळामुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने अजिंक्यपदाला गवसणी घातली. कप्तान रोहन ख्रिस्तियन, महेश सणगर, रोहन जाधव, डॉ. परमेश्वर मुंडे यांनी शर्थीचे प्रयत्न करूनही कस्तुरबा हॉस्पिटलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, डॉ. राजेश मयेकर, क्रिकेटपटू राजेश सुर्वे, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, प्रशिक्षक अनिकेत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.


   शिवाजी पार्क मैदानात ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल विरुद्ध नाणेफेक जिंकून कस्तुरबा हॉस्पिटलने प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीवीर दीपक नाखवा (१६ चेंडूत १८ धावा) व रोहन जाधव (३२ चेंडूत २२ धावा) यांनी १ बाद ३६ धावा असा छान प्रारंभ करून दिल्यामुळे कस्तुरबा हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ८ बाद १०९ धावांपर्यंत मजल मारली. कप्तान प्रदीप क्षीरसागर (१७ धावांत २ बळी) व सुदेश यादव (२१ धावांत २ बळी) यांनी छान गोलंदाजी केली. प्रत्युत्तरादाखल जय तामोरे (४५ चेंडूत ३४ धावा), सुदेश यादव (१२ चेंडूत नाबाद २२ धावा), इसाकी मुत्तू (१५ चेंडूत नाबाद १६ धावा) यांनी आक्रमक फलंदाजी केल्यामुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने १६.४ षटकात विजयी ५ बाद ११३ धावा फटकाविल्या. स्पर्धेमध्ये प्रदीप क्षीरसागरने सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूचा, जय तामोरे व सुशांत गुरव यांनी उत्कृष्ट फलंदाजीचा तर महेश सणगर व कपिल गमरे यांनी उत्कृष्ट गोलंदाजीचा पुरस्कार पटकाविला. यावेळी रुग्णालयीन क्रिकेटपटू रहेजा हॉस्पिटलचे चेतन सुर्वे, केडीए हॉस्पिटलचे ओमकार पाटील, जसलोक हॉस्पिटलचे श्रीकांत दुधवडकर व जे.जे. हॉस्पिटलचे इक्बाल सय्यद यांचा विशेष गौरव करण्यात आला.


   ***************************