दिल्लीची नव्हे ही लोकशाहीची लढाई, शरद पवारांचा केजरीवाल यांना पाठींबा !

Santosh Gaikwad May 25, 2023 05:45 PM


मुंबई : आप चे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दिल्ली सरकारचे बदली बढत्यांचे अधिकारी हिरावून घेण्याच्या केंद्र सरकारच्या निणर्याविरोधातचे विधेयक राज्यसभेत संमत होऊ नये यासाठी आपकडून प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. केजरीवाल यांना शरद पवार यांनी पाठींबा दिला आहे. ही लढाई केवळ दिल्लीची नसून, देशात लोकशाही व्यवस्था वाचविण्याची लढाई आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. 

  

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान हे मुंबईच्या दौ़-यावर आहेत. बुधवारी त्यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर आज (गुरूवारी) शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर आप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संयुक्तिक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल आणि शरद पवारयांनी मोदी सरकारवर आणि त्यांच्या धोरणांवर टीका केली.   

 

शरद पवार म्हणाले, सध्या लोकशाहीवर आघात होत आहेत. दिल्लीत केंद्रसरकारकडून त्यांच्यावर अन्याय झाला आहे. यावर समर्थन मागण्यासाठी ते महाराष्ट्रात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने केजरीवाल यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. सर्वजण एकजुटीने मिळून भाजप आणि केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध करू. राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांवर केंद्र सरकारचे कंट्रोल असणारे विधेयक केंद्र सरकार संसद आणि राज्यसभेत ठेवणार आहे, त्याला आपण सर्वांनी विरोध करायला हवा. दिल्ली सरकारच्या अधिकारांवर केंद्र सरकार गदा आणत असून त्यासाठी भाजप सरकार विधेयकही आणणार आहे पण आम्ही ते विधेयक राज्यसभेत पास होऊ देणार नाही. देशातील लोकशाही वाचवण्याची गरज आहे. केंद्र सरकारविरोधात आम्ही लढा उभारणार आहोत. सर्वांनी यासाठी एकत्र यावे हाच विचार आम्हीही करत आहोत.


अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्लीच्या लोकांसमोर अन्याय होत आहे. २०१५ ला एक नोटिफिकेशन जारी करून अधिकाऱ्यांवरील ताकद काढून घेतली. गेली आठ वर्ष आम्ही कोर्टात लढत होतो. 5-0 ने आम्ही यामध्ये जिंकलो'.  पण आठ दिवसांत केंद्र सरकारने विशेषाधिकाराद्वारे अध्यादेश काढून पुन्हा हा विषय संसदेत नेला आहे. त्यामुळे आमचा अधिकार पुन्हा गमावला गेला. ते आता या मुद्द्याबाबत विधेयक सादर करणार आहेत. ते जेव्हा लोकसभा आणि राज्यसभेत विधेयक ठेवतील तेव्हा ते परित होऊ नये त्याला विरोध व्हावा ही आमची मागणी आहे. हाच विषय घेऊन आम्ही आमच्या सहकारी विरोधकांना भेटत आहोत. शरद पवार यांचे आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. ही केवळ दिल्लीची लढाई नाही, देशाची लढाई आहे, असे केजरीवाल म्हणाले.


भाजपचा ज्या ज्या ठिकाणी पराभव होतो त्या त्या ठिकाणी भाजप पैशांच्या जोरावर सरकार पाडून स्वतःचे सरकार स्थापन करते. तसेच इडीसारख्या तपाससंस्थांचा लोकप्रतिनिधींच्या मागे लावून सरकार पाडते, त्याशिवाय अध्यादेश काढून सरकारला तोडण्याचे प्रकार करीत आहेत राज्य सरकारला काम करू दिले जात नाही असा आरोपही केजरीवाल यांनी केला. २०२४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर येणार नाही असं भाकितही केजरीवाल यांनी केले.