२० जून जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करा : संजय राऊतांचे युनो ला पत्र

Santosh Gaikwad June 20, 2023 10:50 AM


मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे तुकडे होऊन विभाजन झाले आहे. शिंदे यांच्या बंडाला आज २० जून रोजी एक वर्ष पूर्ण हेात आहे. देशातील सर्वात मोठं बंड झाल्याने २० जून हा दिवस जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करण्यात यावा अशी मागणी उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट संयुक्त राष्ट्र संघटनेला  पत्र लिहीत मागणी केली आहे. 


२० जून २०२२ रोजी शिवसेनेतील सर्वात मोठं बंड झालं. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात ४० आमदारांनी बंड केले. हे सर्व आमदार नंतर सूरतहून गुवाहाटी पुढे गोवामार्गे राज्यात थेट सत्तास्थापनेसाठी आले. शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे हे मुख्यमंत्री तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सरकार स्थापन केले. ज्या बंडाने संपूर्ण देशात खळबळ उडवली होती. त्या बंडामुळे एक सरकार कोसळलं त्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. यावेळी प्रत्येक आमदाराने या बंडासाठी ५० कोटी (खोके) घेतल्याचा आरोप शिवसेनेने केला. त्यामुळे २० जून हा सर्व जगात गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी राऊत यांनी केलीय.


यूनोने जागतिक गद्दार दिन घोषित केल्यास जगभरातील गद्दारांना एक व्यासपीठ मिळेल. संयुक्त राष्ट्र संघटनने जाहीर केल्यानंतर २०१५ पासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होतोय, त्याप्रमाणे २० जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असं संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गट आजचा दिवस हा जागतिक खोके दिन तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून गद्दार दिन म्हणून साजरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 

 

शिंदे गटाकडून स्वाभिमान दिन 

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेल्या बंडाला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त शिंदेच्या शिवसेनेच्या वतीनं हा दिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे.