शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी, ' तुमचा दाभोळकर करु ' !

Santosh Gaikwad June 09, 2023 11:26 AM


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ' तुमचा दाभोलकर करु ' असे ट्विट करीत ही धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन गृहविभागाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनाही मोबाईल फोन वरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.  


 राजकारण महाराष्ट्र या फेसबुक पेजवरून शरद पवार यांना धमकी देण्यात आली आहे. तर सौरव पिंपळकर या ट्विटर हॅण्डलवरून आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन यावर तातडीने कारवाईची मागणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे या म्हणाल्या की,शिंदे फडणवीस यांच्याकडे दाद मागतेय, पण देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे न्याय मागते. गृहमंत्रालयाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी. जर काही बरं-वाईट झालं तर याला फक्त केंद्रीय गृहविभाग जबाबदार असेल, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. राजकारणात मतभेद असतात पण इतका द्वेष समाजात पसरला जातोय. राज्यात दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे असा संतापही सुळे यांनी व्यक्त केला.   


दरम्यान गुरूवारी माजी खासदार निलेश राणे यांनी   शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडत थेट औरंगजेबाशी त्यांची तुलना केली होती. या घटनेनं राष्ट्रवादीतील नेते आक्रमक झाले आहेत. निलेश राणे  यांनी शरद पवार  यांच्याबद्दल केलेलं वादग्रस्त ट्वीट डिलिट करावे. अन्यथा जेल भरो आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.  शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 


धमकी देणा-यावर कारवाई झाली पाहिजे  


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. धमकी देणे हे आमच्या रक्तात नाही. शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत त्यामुळे जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असे बावनकुळे म्हणाले. 


 संजय राऊत यांनाही धमकी ....


शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सुनील राऊत यांच्या मोबाइलवर फोनवर ही धमकी देण्यात आली आहे. राऊत यांना सकाळचा भोंगा बंद करायला सांगा एक महिन्याची मुदत देतो. अशी हिंदी भाषेतील संभाषणाची ऑडीओ क्लीप आहे. ही माहिती राऊत यांनी मुंबई पोलिसांना दिली आहे. 

--------------------