दत्ताचा जन्मोत्सव, मठ आणि मंदिरांमध्ये गुंजणार दिगंबरा-दिगंबरा !

Santosh Gaikwad December 26, 2023 12:15 PM


मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा (Datta) जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. आज मंगळवार 26 डिसेंबर 2023 रोजी दत्त जयंती (Datta Jayanti 2023) आहे. या दिवशी दत्ताची मनोभावे पूजा केल्याने, उपासना केल्याने दत्ततत्त्वाचा अधिक लाभ मिळतो, अशी मान्यता आहे. 


भगवान दत्तात्रेय हे महर्षी अत्री मुनी आणि देवी अनुसूया यांचे पुत्र आहेत.भगवान दत्तात्रेयामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे. त्यामुळे, दत्तामध्ये गुरू आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे. भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला तिन चेहरे आणि सहा हात आहेत. विशेष म्हणजे भगवान दत्तात्रेयांचे 24 गुरू होते, त्यामुळे दत्तजयंतीला अतिशय महत्व आहे. भगवान दत्तात्रेयांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्या भक्तांना अपार ज्ञान मिळते आणि त्यांचे जीवन सुफळ संपन्न होते.

देशात भगवान दत्ताची अनेक प्राचीन मंदिरं आहेत. पुराणानुसार, त्यांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला झाला होता. या दिवशी दत्त जयंती (Datta Jayanti) साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त पूजा आणि दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.