SHIVNER NEWS AGENCY
नाशिक दि. ११ – सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेतर्फे दरवर्षी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार देण्यात येतो. सन २०२४ चा पुरस्कार *सारंग शंतनू दर्शने* यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण पुण्याचे दै. सकाळचे संपादक श्री. सम्राट फडणीस यांच्या शुभहस्ते रविवार दि. ५ जानेवारी,२०२५ रोजी सायंकाळी ६.००वा. ग्रंथालयभूषण मु.शं.औरंगाबादकर सभागृहात देण्यात येणार असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके व प्रमुख सचिव देवदत्त जोशी यांनी दिली.
पत्रकार पुरस्कारासाठी दै.दिव्य मराठीचे संपादक श्री. अभिजित कुलकर्णी, दै. लोकमतचे संपादक श्री. मिलिंद कुलकर्णी, दै. सकाळचे श्री. अभय सुपेकर तसेच सार्वजनिक वाचनालयाचे पदसिद्ध सदस्य म्हणून अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, प्रमुख सचिव श्री. देवदत्त जोशी या सदस्यांच्या निवड समितीने सदर पुरस्काराची निवड केली. रु.११०००/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
२००८ पासून सावानाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. आजवर अतुल देऊळगावकर, प्रकाश अकोलकर, वि. वि. करमरकर, मोरेश्वर बडगे, देवेंद्र गावंडे, सुरेश भटेवरा, जय देशमुख, अभिजित घोरपडे, अपर्णा वेलणकर, संतोष आंधळे, सुनील चावके, राजीव खांडेकर, विजय बाविस्कर, निलेश खरे, श्रीकांत बोजेवार या मान्यवर पत्रकारांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.