दमानियाचं ट्विट, भाजपचा बी प्लॅन अन् राष्ट्रवादी काँग्रेसभोवती संशयाचं वादळ ...

Santosh Gaikwad April 12, 2023 05:41 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे नॉटरिचेबल असल्याने भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता अंजली दमानिया यांनी १५ आमदार बाद होणार अजित पवार भाजसोबत जाणार असं ट्विट कल्याने पून्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे . गेल्या काही दिवसात शरद पवार यांची विविध मुद्द्यांवर बदललेली भूमिका, अजित पवार यांचं अचानक १७ तास गायब होणं, अंजली दमानियांचं भाष्य, भाजपचा प्लॅन बी या सर्वांवर राष्ट्रवादी काँग्रेसभोवती संशयाचं वादळ घोंगावतंय. दमानियांच्या दाव्यावर अजित पवार यांनी खिल्ली उडवली आहे. तर  राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र हे सर्व दावे खोडून काढलेत. पण १५ मिनिटांनी पाऊस पडेल का, हे मीही सांगू शकत नाही, अशी मिश्किल टिप्पणीदेखील केली.


 मागील आठवडयात अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांच्या सकाळच्या शपथविधीचा फोटो  ट्विट करीत ' मी पुन्हा येईन.  किळसवाणे राजकारण ' अशी कॅप्शन दिली होती. शुक्रवारी नॉटरिचेबल असलेले अजित पवार तब्बल १७ तासानंतर  शनिवारी सकाळी पुण्यात एका कार्यक्रमात सपत्नीक हजेरी लावली होती. जागरण दौरे यामुळे झोप न झाल्याने पित्ताचा त्रास झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने घरी होतो असे सांगत, प्रसिद्धी माध्यमांच्या नॉटरिचेबल बातमीवर नाराजी व्यक्त केली होती.  मात्र पून्हा दमानिया यांनी अजित पवार हे १५ आमदारांसह भाजपला पाठिंबा देतील, असं ट्वीट केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र दमानियांच्या या दाव्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार, असं म्हणत  पवारांनी एक प्रकारे खिल्ली उडवली.


राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही. राजकीय नेत्यांच्या वेळोवेळी बदलत्या भूमिकांमुळे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातल्या  रात्री-अपरात्रीतून घडलेल्या घडामोडींमुळे काहीही घडू शकतं अशी चर्चा सुरू आहे. सुप्रीम कोर्टात एकिकडे शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित आहे. या खटल्यावर कोणत्याही क्षणी सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोर्टाचा निकाल शिंदेंच्या विरोधात लागला तर पुढे काय ? भाजपची आणखी कोंडी होणार का, अशी चर्चा असतानाच भाजप बी प्लॅन तयार करीत असल्याचं समजतय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात काही तरी घडतयं अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.