अजित नाईक स्मृती क्रिकेट स्पर्धेत माटुंगा, ठाणे केद्राची सरशी

Santosh Sakpal May 10, 2023 09:00 PM

MUMBAI : वरळी स्पोर्ट्स क्लब आयोजित २६ व्या अजित नाईक स्मृती १४ वर्षाखालील दोन दिवशीय एमसीए क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या साखळी लढतीमध्ये माटुंगा केंद्राने वेंगसरकर अकॅडमीचा पहिल्या डावातील ३२ धावांच्या आघाडीमुळे अनिर्णीत राहीलेल्या सामन्यात वर्चस्व राखले. सामनावीर कुशाल पाटीलचे १४ धावांत ४ बळी व वेद तेंडूलकरच्या ८५ चेंडूत ४२ धावा, यामुळे माटुंगा केंद्राची सरशी झाली. वेंगसरकर अकॅडमीतर्फे अर्धशतकवीर युवराज भिंगारे (१०१ चेंडूत ५६ धावा), झैद खान (३१ धावांत ५ बळी), देवांग तांडेल (३२ धावांत ४ बळी) यांनी छान खेळ करूनही माटुंगा केंद्राने पहिल्या डावात १२७ धावा फटकावून प्रतिस्पर्ध्यांची ९५ धावसंख्या पार केली.      

    दुसऱ्या साखळी सामन्यात ओम बांगरने (७५ चेंडूत ६२ धावा) आक्रमक फलंदाजी करूनही ठाणे केंद्राच्या अद्वैत जोशी (१७ धावांत ५ बळी) व देवांश शिंदे (४१ धावांत ४ बळी) यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे चेंबूर केंद्राचा पहिला डाव १४४ धावांवर संपुष्टात आला. शतकवीर समृध्द भट (१५३ चेंडूत १०९ धावा), प्रणय अयंगर (८८ चेंडूत ५० धावा) व शौर्य साळुंखे (७० चेंडूत ६५ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे ठाणे केंद्राने ४ बाद २९१ धावांचा डोंगर उभारला. चेंबूर केंद्राने ओम बांगरच्या (६६ चेंडूत ७० धावा) आक्रमक फलंदाजीमुळे १५५ धावा फटकावीत शेवटचा दुसरा दिवस संपविला. हर्ष कदम (२७ धावांत ३ बळी) व प्रणव अयंगर (९ धावांत ३ बळी) यांनी छान गोलंदाजी केली. परिणामी निर्विवाद विजयाचे लक्ष्य ठाणे केंद्राने साकारले नसले तरी पहिल्या डावातील आघाडीवर सामन्यात वर्चस्व मिळविले.