नॅशनल, नवरोज क्लब विजयी

SANTOSH SAKPAL April 12, 2023 07:57 PM

MUMBAI : भामा क्रिकेट क्लबतर्फे मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यतेने सुरु झालेल्या दुसऱ्या १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत नॅशनल क्रिकेट क्लब, नवरोज क्रिकेट क्लबनी सलामीचे सामने जिंकले. आयुष वर्तकच्या धडाकेबाज नाबाद द्विशतकामुळे नॅशनल क्रिकेट क्लबने मंगरोल क्रिकेट क्लबचा ३२८ धावांनी धुव्वा उडविला. आयुष वर्तकने ११० चेंडूत १७ चौकार व १६ षटकारांच्या आतषबाजीने शानदार नाबाद २१५ धावा फटकाविल्यामुळे नॅशनल क्लबने ३२ षटकात २ बाद ४८० धावांचा डोंगर रचला. वेदांत पाटील (२४ धावांत ५ बळी) व आदर्श राणे (४ धावांत ४ बळी) यांनी अचूक गोलंदाजी करून मंगरोल क्लबचा डाव १०२ धावांत गुंडाळला.

दुसऱ्या सामन्यात अष्टपैलू सोहम राणे (६९ धावा) व संस्कार पावसकर (५४ धावा) यांच्या अर्धशतकी खेळामुळे नवरोज क्रिकेट क्लबने युनायटेड क्रिकेटर्स विरुद्ध ३५ षटकात ७ बाद २४४ धावा फटकाविल्या. सोहम राणे (२२ धावांत ३ बळी) व अथर्व सावंत (११ धावांत ३ बळी) यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे युनायटेड क्रिकेटर्सचा डाव २९.४ षटकात १५२ धावांत गारद झाला. आर्य गांधी (४० धावा), सर्वेश खान्हेकर (३४ धावा), श्रावण अकोलेकर (३० धावा) यांनी युनायटेड क्रिकेटर्सचा डाव सावरण्याचा छान प्रयत्न करूनही त्यांचा निभाव लागला नाही. परिणामी नवरोज क्रिकेट क्लबने ९२ धावांनी मोठा विजय मिळविला.