भ्रष्टाचार हाच भाजपचा चेहरा संजय राऊतांचा घणाघात

Santosh Gaikwad February 02, 2024 11:07 PM


मुंबई, दि. २ः 
भाजपने आजवर ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले. ते सगळे भाजपसोबत गेले. मंत्री छगन भूजबळ देखील भाजपच्या वाटेवर आहेत. भ्रष्टाचार हाच भाजपचा चेहरा आहे. जो भ्रष्टाचारी भाजप सोबत जातो, तो पवित्र होत असल्याचा घणाघात शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी चढवला. केंद्रीय तपास यंत्रणांच्या आडून कारवाई सुरू आहे. देशातील या हुकूमशाही विरोधात लढणार, असा इशारा राऊत यांनी दिला. मुंबईत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

भुजबळ भाजपसोबत जाणार असा, दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. राऊत यांनी यावर भूमिका मांडली. भुजबळ कोणत्या पक्षात जातील हे सांगू शकत नाही. परंतु, भाजपचा चेहरा बनू शकतात. उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी भाजपचे चेहरा बनले आहेत. ज्यांच्यावर आजवर आरोप केले, ते सगळ भाजपमध्ये आहेत. भ्रष्टाचार हाच भाजपाचा चेहरा आहेत. जो भ्रष्टाचारी भाजपममध्ये जाता, तो पवित्र बनतो असा हल्लाबोल राऊत यांनी केला. हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल यांच्यावर बेकायदेशीर कारवाई सुरू आहे. देशात ईडीच्या ९९ टक्के कारवाया बोगस आहेत. भाजपची विस्तारीत शाखा म्हणून ईडी काम करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. ईडी आणि ईव्हीएम शिवाय भाजप येत्या निवडणुका जिंकू शकत नसल्याचे ते म्हणाले.

कॉंग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी अजित पवार गटात म्हणजचे भाजपसोबत जात आहे.मुस्लिम समाजात फूट पाडण्याचा भाजपचा डाव आहे. त्यांनी पक्षांतर केल्यास वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर शिवसेना निवडणूक लढवून जिंकेल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. तसेच बाबा सिद्दीकीसारखी लोक अशी कृती करत असतील तर समाज आणि देश त्यांना माफ करणार नाही, असे राऊत म्हणाले.