राज्यात डोळयांची साथ वाढतेय, काळजी घेण्याचे बीएमसीचे आवाहन

Santosh Gaikwad July 29, 2023 09:43 PM


मुंबई :  मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कन्‍जक्‍टिव्‍हायटीस म्हणजेच डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे ज्यांना हा संसर्ग झाला असेल त्यांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.


मुंबईमध्ये डोळे येण्याच्या संसर्गामध्ये अद्याप कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही. मात्र सध्या मुंबईत पाऊस सुरू असल्याने हवेतील आर्द्रता वाढून डोळे येण्याची विषाणूजन्य साथ पसरू शकते. ही साथ 'अत्यंत सांसर्गिक' आहे आणि तिचा प्रसार रोखण्यासाठी डोळ्यांची योग्य निगा राखणे आवश्यक असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. मुंबईमध्ये डोळे येण्याची साथ पसरू नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने  विविध उपाययोजना हाती घेतल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली. 


संसर्ग झाल्याची लक्षणे

डोळ्यांचा विषाणू संसर्ग हा मुख्यत्वे अ‍ॅडीनो वायरसमुळे होतो. याच्या लक्षणांमध्ये डोळ्यांना खाज सुटणे, डोळे लाल होणे, पापण्या सुजणे आणि संसर्ग झालेल्या डोळ्यांतून पांढरा स्त्राव येणे,  यांचा समावेश होतो. डोळ्यांचा विषाणूजन्य संसर्ग हा सौम्य प्रकारचा संसर्ग असला तरी देखील याबाबत नागरिकांनी आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. 


या शहरात रूग्ण वाढले

पुणे जिल्ह्यात डोळ्यांची साथ जास्त वाढली आहे. पुण्यात 7 हजार 871 रुग्ण आढळले आहेत. तर बुलढाणा जिल्ह्यात 6 हजार 693 रुग्ण आढळले आहेत. अमरावती जिल्ह्यात 2 हजार 611 रुग्ण आढळले आहेत. गोंदिया जिल्ह्यात 2 हजार 591 रुग्णांची नोंद झालीय. तर धुळे जिल्ह्यात 2 हजार 295 रुग्णांची नोंद झालीय. जालना जिल्ह्यात 1 हजार 512 रुग्ण आढळले आहेत. वाशिम जिल्ह्यात 1 हजार 427 रुग्ण आढळले आहेत. तर हिंगोली जिल्ह्यात 1 हजार 425 रुग्ण आढळले आहेत. नागपूर जिल्ह्यात 1 हजार 323 रुग्ण आढळले आहेत. नाशिक शहरात देखील डोळ्यांच्या आजाराची साथ पसरली आहे. शहरात दोन दिवसात 156 रुग्ण आढळले आहेत.


डोळे येण्याची लक्षणे कोणती ?

1) डोळे लाल होणे आणि पिवळसर द्रव डोळ्यातून येणे

2) डोळ्यातून सतत पाणी येत राहणे

3) डोळे सतत चोळावेसे वाटणे

4) दोन्ही डोळ्यांना एकदम सूज येणे

5) डोळ्यांना सतत खाज येणे

6) पापण्या एकमेकांना चिकटणे


डोळे आल्यास काय काळजी घ्यावी ?

डोळ्यांना स्वच्छ पाण्याने धुत राहावे

नेत्र संसर्ग असेपर्यंत कुटुंबापासून वेगळे तसेच सुरक्षित अंतर ठेवावे.

डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमालाचा वापर करा

उन्हात काळ्या रंगाच्या चष्म्यांचा वापर करावा


डोळ्याची साथ पसरू नये म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजना,


• मुंबईत ज्या परिसरात अधिक रुग्ण आहेत तेथे बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाचे कर्मचा-यांकडून घरोघरी भेटी देऊन सर्वेक्षण केली जात आहे. 

• याबाबत सर्वसामान्य नागरिकांना जनजागृती करून आवश्यक ती माहिती दिली जाते.

•सर्व आरोग्य संस्थांमध्ये  कन्‍जक्‍टीव्‍हायटीस (Conjunctivitis) आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध आहेत, 


डोळ्याची साथ पसरू नये म्हणून नागरिकांना खालीलप्रमाणे आवाहन -


•ज्या विभागात पावसामुळे माश्या किंवा चिलटाचा प्रादुर्भाव असेल तर तो परिसर स्वच्छ ठेवावा.

•ज्या व्यक्तींमध्ये कन्‍जक्‍टीव्‍हायटीस (Conjunctivitis) आजाराची लक्षणे आढळतात, त्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे तसेच डोळ्याला वारंवार हात लाऊ नये, तसेच नियमित हात धुणे आवश्यक आहे.

•एकापासून दुस-या व्यक्तीला हा संसर्ग वेगाने होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.

• व्यक्तीचे कपडे, टॉवेल आणि चादरी स्वतंत्र ठेवावीत जेणेकरून रोगाचा प्रसार कुटुंबातील इतर सदस्यांना होणार नाही.

•शाळा, वसतिगृह, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी जर अशी साथ असेल तर डोळे आलेल्या मुलाला/मुलीला किंवा व्यक्तीला वेगळे ठेवण्याची गरज आहे. शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांना कन्‍जक्‍टिव्‍हायटीस ची लक्षणे आढळून आल्यास त्यांना शाळेत पाठवू नये. 

•डोळ्याचा हा संसर्ग सौम्य स्वरूपाचा असला तरी कन्‍जक्‍टिव्‍हायटीस आजाराची लक्षणे आढळल्यास नजीकच्या मनपा रुग्णालयात, दवाखान्यात,आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावा