काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार ? ; आज कोअर कमिटीची बैठक !

Santosh Gaikwad June 13, 2023 10:06 AM

मुंबई : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच काँग्रेसही अॅक्शन मोडवर आली आहे. निवडणुकीसंदर्भात आज मुंबईत काँग्रेसच्या कोअर कमिटीची आढावा बैठक होत आहे या कोअर कमिटीच्या बैठकीला काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील हे उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसने मुंबई अध्यक्ष बदलल्यानंतर आता राज्यातही मोठे फेरबदल होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौ-यावर येत आहेत. आज काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक  दुपारी ४ वाजता गरवारे क्लब हाऊस वानखेडे स्टेडियम डी रोड चर्चगेट मुंबई येथे होत. प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. राज्याची काँग्रेसची समिकरण काय असणार आहेत. कोणत्या जिल्हयात काँग्रेसची किती ताकद आहे या सर्व बाबींचा उहापोह या बैठकीत होणार असल्याचे समजते. आगामी रणनिती ठरविण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांशी व पदाधिका-यांशी चर्चा करून मतं जाणून घेतली जाणार आहेत.  


विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर अनेक नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नाना पटोले यांना प्रदेशाध्यपदावरून हटवण्यासाठी पक्षातूनच प्रयत्न होत असल्याचं दिसून आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्षानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील मुंबई दौऱ्यावर येत आहेत. पाटील या दोन दिवसांच्या दौऱ्यात राज्यातील नेत्यांशी चर्चा करणार आहेत. विदर्भातील नेत्यांनी नाना पटोले यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आगामी निवडणुकांआधी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार अशी चर्चा आता रंगू लागली आहे.