तेव्हा नैतिकता कुठल्या डब्यात बंद होती ? : फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Santosh Gaikwad May 11, 2023 06:46 PM


मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी  मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सरकारला घटनाबाह्य, बेकायदेशीर म्हणणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने चपराक बसली आहे तर फडणवीस यांनी ठाकरेंच्या नैतिकतेच्या मुद्द्यावरून टीका केली. भाजपसोबत निवडणुकीत निवडून आलात आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलात तेव्हा ही नैतिकता कुठल्या डब्यात बंद केली होती? याचं उत्तर द्या, असं आव्हान फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलं.

शिंदे, फडणवीस यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच स्वागत केलं. मुख्यमंत्री म्हणाले की, अपात्रतेचा निर्णय अध्यक्ष घेतील. निवडणुक आयोगाने धनुष्यबाण दिला. आम्ही बहुमताचा निर्णय घेतल्यानंतर निवडणुक आयोगाने निर्णय दिला. त्यांच्याकडे बहुमत नव्हते त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता. आम्ही जनभावनेचा आदर केला. शिवसेना-भाजप सोबत लढले दुसऱ्यांसोबत सरकार स्थापन केले. बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्याचे काम आम्ही केले. बहुमताचा आदर सुप्रीम कोर्टाने केलाय.

फडणवीस म्हणाले की, नैतिकतेचा विषय उद्धव ठाकरेंनी सांगू नये. कारण तुम्ही मुख्यमंत्रीपदाच्या खुर्ची करता विचार सोडला आणि एकनाथ शिंदे यांनी विचारासाठी खुर्ची सोडली. आणि शिंदे हे सत्तेत होते आणि विरोधी पक्षासोबत म्हणजेच आमच्यासोबत आले. त्यामुळे नैतिकतेवर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार तुम्हाला नाही. उद्धवजी तुमच्या लक्षात आलं होतं, तुमच्याकडे नंबर नाहीत (आमदारांचं संख्याबळ), तुम्ही हारणार आहात. लोकं तुम्हाला सोडून गेलेत. त्यामुळे त्या लाजेपोटी आणि त्या भीतीपोटी तुम्ही राजीनामा दिला. त्यामुळे विनाकारण त्याला नैतिकतेचा मुलामा चढवण्याचा प्रयत्न करू नका. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण आज त्यांच्या नियुक्तीवर सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केलं आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.