बालदिनी एलआयसी-आयडियल कप १२ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धा   

Santosh Sakpal November 06, 2023 09:52 PM

MUMBAI -NHI:-

   आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे बालदिनानिमित्त १४ नोव्हेंबर रोजी एलआयसी-आयडियल कप ७/८/९/१०/११/१२ वर्षाखालील मुलामुलींची विविध ६ वयोगटांमध्ये बुध्दिबळ स्पर्धा आरएमएमएस वातानुकुलीन सभागृह, परेल, मुंबई-१२ येथे आयोजित करण्यात आली आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया प्रायोजित स्पर्धेला आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना यांचे सहकार्य लाभले आहे. ही स्पर्धा स्विस लीग पध्दतीने होणार असून विजेत्या-उपविजेत्यांना एकूण १२० पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी दिली. 

    प्रत्येक वयोगटात किमान चार साखळी फेऱ्यांमधील प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. प्रत्येक गटामधील पहिल्या ७ मुलांना व पहिल्या ३ मुलींना आकर्षक एलआयसी-आयडियल कपचा आणि त्यापुढील १० उपविजेत्यांना एलआयसी-आयडियल मेडल्सचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. संयोजकांतर्फे बुध्दिबळपट, घड्याळ आदी साहित्य पुरविण्यात येणार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (व्हॉटस अॅप क्रमांक ९३२४७ १९२९९) यांच्याकडे ८ नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधावा.