शिंदे गटात मंत्रिपदासाठी चुरस, दोन आमदार आपसात भिडले ? मुख्यमंत्र्यांकडून कानमंत्र !

Santosh Gaikwad July 06, 2023 10:23 AM


मुंबई : अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर  शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली . मात्र गेल्या वर्षभरापासून मंत्रीपदासाठी आस लावून बसलेल्या शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. या नाराजीतूनच शिंदे गटातील दोन आमदार आपआपसात भिडल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी चुरस निर्माण झाली आहे.  दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री शिवसेनेचे आमदार तसेच खासदारांची वर्षा या शासकीय निवास्थानी बैठक घेतली. मुख्यमंत्रीपदी मीच कायम राहणार असून, आपण ५० जागा जिंकून आणू त्यावर फोकस करा, असा कानमंत्र शिंदेंनी आमदारांना दिला असल्याचे समजते.


राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप सरकार स्थापन होऊन एका वर्षाचा कालावधी लोटला. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी ९ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. एका मंत्रयांना अनेक खात्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे सांगितले जात आहे मात्र  त्यानंतर सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रीपदाची वर्षभरापासून आस लावून बसलेले असतानाच, अचानक रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट शिंदे सरकारमध्ये सामील झाला. एका दिवसात राष्ट्रवादीच्या ९ आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. शिंदे गटातील आमदार वर्षभरापासून मंत्रीपदासाठी प्रतिक्षेत असतानाच राष्ट्रवादी आमदारांना मंत्रीपदाची शपथ मिळाल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली असून, आमदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. राष्ट्रवादी हा सत्तेचा वाटेकरी बनल्याने शिंदे गटाला किती मंत्रीपद मिळतेय याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार यावरून आमदारांमध्ये चुरस  निर्माण झाली आहे. तर वर्षभर मंत्रीपद उपभोगा-यांना बाजूला सारून नवीन चेह-यांना संधी देण्याची मागणीही इतर आमदारांमधून होत आहे.  त्यामुळे मंत्रीपदावरूनच शिंदे गटातील दोन आमदार आपसात भिडल्याचे सुत्रांनी सांगितले. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला नियोजित नागपूर दौरा सोडून आमदारांचे भांडण सोडवण्यासाठी मुंबईत परतावे लागल्याचे सूत्रांनी सांगितले.  


दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी आमदारांची बैठक घेऊन त्यांना कानमंत्र दिल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार यांचा सरकारमधील प्रवेश म्हणजे केवळ राजकीय तडजोड आहे. ही तडजोड शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्या विरहीत आहे. यापुढे घराणेशाहीच्या राजकारणाला आता स्थान मिळणार नाही. असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना ठणकावून सांगितल्याचे सुत्रांनी सांगितले. माझ्या राजीनाम्याच्या बातम्या कोण पेरत आहेत हे देखील मला माहीत आहे. पण आपण या सगळ्याबाबत योग्य ती काळजी नक्कीच घेऊ. त्याचप्रमाणे संकटकाळात पाठिंबा देणाऱ्या सर्व ५० आमदारांना आपण निराश करणार नाही, असं आश्वासन देखील त्यांनी दिलं असून, सर्व आमदारांनी त्यांच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करावे असेही शिंदेंनी आमदारांना सांगितल्याो सुत्रांकडून समजले.